राज्यात विधानसभा निवडणुकीचं वार वाहतं आहे. पण अद्यापपर्यंत दोनही आघाड्यांचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. अशातच आता काल रात्री उशिरा राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील निवडणूक आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला यावर चर्चा झाली. यात भाजपच सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती आहे. भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटा 75 ते 80 जागा लढेल. तर राष्ट्रवादी अजित पवार गट 55 ते 60 जागा लढणार असल्याची माहिती आहे.
भाजप 142, शिंदे गट 66 आणि अजित पवार गट 52 जागा लढणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काल रात्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या वेळी अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटप फॉर्म भरण्याच्या आत केलं जाईल. तुम्ही काळजी करू नका… तिघांची बैठक झाली आहे काळजी करू नका. आम्ही तिघे एकत्रित प्रेस घेऊ कुणाकुणाला किती जागा मिळाल्या आहेत ते स्पष्ट करू. महायुतीच्या जागावाटपामध्ये काहीही अडचण नाहीये, असं अजित पवार म्हणाले.
महायुतीची काल रात्री दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा केली. जागावाटपाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. काही जागांवर महायुतीत अद्यापही तिढा कायम आहे. मात्र आता राज्य पातळीवर हा तिढा सोडवा अशा सूचना एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीनही नेत्यांना अमित शाह यांनी दिल्या आहेत.
राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. विदर्भातील जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आज शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार होती. मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादामुळे ही यादी लांबणीवर पडली आहे.