मुंबई | स्वप्ननगरी, अर्थनगरी अशी असंख्य विशेषणं ही मुंबई शहराच्या ओळखीसाठी कमी पडतील. सिनेमात दाखवलेलं मुंबईचं रुप पाहून आयुष्यात एकदातरी मुंबईत फिरायलं हवं, अशी इच्छा ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येकाची असते. ज्यांची मुलं आर्थिकरित्या सक्षम आहेत, ते आपल्या आई वडिलांना देव-दर्शनाला नेतात. पण काही असेही असतात ज्यांना त्यांचे जन्मदाते नकोसे होतात. मग ज्या वयोवृद्धांना कुणीच नाही, त्यांच्या आनंदाचा कोण विचार करेल? मात्र महेश पवार या तरुणाने या वृद्धांना आनंद देण्यासाठी ‘जीवाची मुंबई’ या कार्यक्रमाचे आयोजन केलं.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्धांना मुंबईतील पर्यटनस्थळांचं आणि धार्मिक स्थळाचं दर्शन झालं. ‘जीवाची मुंबई’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजक महेश पवार यांनी 20 निराधार वयोवृद्धांना मुंबईचं दर्शन घडवलं. या 20 जणांमध्ये
कुणी वॉचमनचे काम करतो. कुणी शेतीकाम, भाजीपाला विक्री आणि धुणीभांडी अशी कामं करुन उदरनिर्वाह करतात.
‘जीवाची मुंबई’ या उपक्रमाअंतर्गत या 20 निराधारांनी सिद्धीविनायक, चैत्यभूमी आणि हाजीअली या धार्मिक स्थळांना भेट दिली. तसेच या 20 जणांनी बेस्ट बसच्या निलांबरी या विशेष बस सेवेत संध्याकाळी फिरण्याचा आनंदही घेतला. तसेच सयाजी शिंदे अभिनेते यांनी मोबाईल वर व्हिडिओ कॉल करून या वृद्धांसह संवाद साधला.
या वृद्धांनी मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्यांचीही भेट घेतली. विशेष बाब म्हणजे या दरम्यान या वृद्धांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही भेटता आलं. उपमुख्यमंत्र्यांशी निराधारांनी संवाद साधला तेव्हा. देवेंद्र गणवीर, निर्मला राठोड, शोभा राव, वामन चौधरी, इंदूबाई पोटपिल्लेवर, विष्णू शिंदे आणि इतर निराधारांनी उपमुख्यमंत्र्यांसह सोबत संवाद साधला.
यावेळेस वृद्धांनी निराधार पेन्शन इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात कमी असल्याचं उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं. या निराधार पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी निराधारांनी केली. या अधिवेशनात याबाबत पेन्शनवाढीबाबत घोषणा करावी अशी फडणवीस साहेबांना विनंतीही केली.
किमान आयुष्याचे शेवटचे दिवस तरी गोड व्हावे, म्हणून खास वयोवृद्धांसाठी ‘जीवाची मुंबई’ हा कार्यक्रम राबवित आहोत.
या उपक्रमाचे मुख्य आयोजक हे महेश पवार होते. तर देवेंद्र गणवीर, वर्षा विद्या विलास आणि संतोष गरजे यांचं सहकार्य लाभलं.