मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा दौऱयादरम्यान जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलं आहे. पंकज कुंभार असं या युवकाचं नाव आहे. त्याला मुंबईतील आग्रीपाडा इथून अटक करण्यात आली आहे. हा युवक मनोरुग्ण असल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पंकज कुंभारने त्याच्या फेसबुक वॉलवरुन मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. “मी जमाल कसाब असून या अगोदर अजित पवार वाचले आहेत, 4 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा असल्याने, मुख्यमंत्र्यांसह 40 हजार लोकांना मारु” अशी धमकी या युवकाने दिल्याने सुरक्षा यंत्रणा खडबडून तापासाला लागल्या होत्या.
मात्र रविवारी हा तरुण स्वत:च मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात आला आणि आपण मुख्यमंत्र्यांना मारणार असल्याचे सांगितल्यावर, पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन, सातारा पोलिसांकडे सुपूर्द केलं.