आजपर्यंत आडमुठी भूमिका घेतल्यामुळेच मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले असा आरोप मनोज जरांगे यांचे नाव न घेता करण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी नाव न घेता जरांगे पाटील यांच्यावर असा आरोप केला आहे. मात्र आता समाजाला सत्य सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही लवकरच मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा बांधव बैठकीचे आयोजन करून निर्णय घेणार असल्याचं नागणे यांनी सांगीतले. या नवीन भूमिकेमुळे आता वादाला फोडणी बसली आहे.
ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण
मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने 50% च्या आतून ओबीसीमधून आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा सरकारला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. या नवीन भूमिकेवर आता जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. पण या नवीन भूमिकेमुळे मराठा आरक्षणावरून नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
आता काय दिला अल्टिमेटम
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला मराठा आरक्षणाविषयी थेट इशारा दिला आहे. राज्य सरकारला त्यांनी नवीन अल्टिमेटम दिला आहे. येत्या 5 जानेवारी 2025 पर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी महायुतीला सरकार स्थापन्याच्या शुभेच्छा दिल्या.
सरकारला परेशान करणार
सरकारने 5 जानेवारपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. नाहीतर मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहतील आणि सरकारला परेशान करतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची आहे. नाटकबाजी बंद करायची, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करु असं त्यांनी सांगीतलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटलं असतील तर चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे येत्या दिवसात राज्यातील महायुती सरकारपुढे मोठे आव्हान उभं ठाकणार आहे.