मुंबई : मुंबईतील मंत्रालयातील असिस्टंट रिर्सचर काम करणाऱ्या 32 वर्षीय कर्मचारी प्रीती दुर्वे यांचा आज मृत्यू झाला. लोकसभा निवडणुकीदरम्यान बरं नसतानाही निवडणुकीचे काम लावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रीतीच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रीतीच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात 29 एप्रिलला मुंबईत मतदान पार पडलं. यावेळी प्रीती दुर्वे यांना मंत्रालयातून शिवडी विधानसभा मतदारसंघात इलेक्शनची ड्युटी लावली होती. मात्र 19 एप्रिलला प्रीती यांची तब्येत बिघडली. त्यावेळी त्यांना कावीळ झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रीती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुट्टी मिळावी यासाठी अर्ज केला होता. मात्र शिवडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी त्यांची ही रजा मंजूर केली नाही. रजा मंजूर न झाल्याने प्रीती यांनी 10 दिवस उन्हात काम केले, असं प्रीती यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
मात्र मतदानावेळी म्हणजेच 29 एप्रिलला प्रीतीला जास्त अस्वस्थ वाटू लागले. यामुळे ऑन ड्यूटी असताना प्रीती यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना नायर रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
”आजारी असूनही प्रीतीकडून निवडणूक आयोगाने जबरदस्ती काम करुन घेतलं. आजारी असतानाचा सुट्टीचा अर्ज करुनही तिला सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे सुट्टी न देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी प्रीतीच्या कुटुंबीयांनी केली आहे”.
कोण आहेत प्रीती दुर्वे ?
प्रीती दुर्वे या कल्याणमध्ये राहतात. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या मंत्रालयात असिस्टंट रिर्सचर म्हणून काम करत होत्या. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत.