मुंबई: कांजूरमार्ग येथे मेट्रो-3 प्रकल्पाची (Metro 3) कारशेड उभारण्यासाठी राज्य सरकारने तत्वत: मान्यता दिल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. कारशेडसाठी ही जागा योग्य आहे, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला. (Metro 3 project car shed in Kanjurmarg)
विधानसभेत मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. एकनाथ शिंदे यांनी लेखी स्वरुपात ही माहिती सादर केली. मेट्रो कारशेडसाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. सन 2031 पर्यंत आरे कारशेडमध्ये 42 गाड्यांचा समावेश करता येईल. पुढील वाहतुकीसाठी पाच हेक्टर जागेची आवश्यकता लागेल. त्यासाठी एक हजारापेक्षा जुनी झाडे तोडावी लागतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने पर्यावरणवादांचा विरोध झुगारत एका रात्रीत कारशेडसाठी आवश्यक असलेली सर्व झाडे तोडून टाकली होती. त्यामुळे आरे आंदोलन आणखीनच चिघळले होते. तेव्हा शिवसेनेने आपण सत्तेत आल्यास मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले होते.
कांजूरमार्गच्या जागेसाठी एका नव्या पैशाचाही खर्च होणार नाही. मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने ही जागा मोफत देऊ केली आहे. तसेच आतापर्यंत आरे परिसरातील कारशेडसाठी झालेले बांधकाम आणि खर्चही वाया जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा विनियोग राज्य सरकार योग्यप्रकारे करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या
मोठी बातमी: मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
आरेतील कारशेड कांजूरला नेल्यास मेट्रोला पाच वर्षांचा विलंब आणि 5000 कोटींचा भुर्दंड- सोमय्या
कांजूरमार्ग कारशेड म्हणजे ‘नो-कॉस्ट’नव्हे, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
(Metro 3 project car shed in Kanjurmarg)