मुंबई : ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदाबाबत ठाकरे सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. गृहनिर्माण मंत्र्यांकडे ‘म्हाडा’चं अध्यक्षपद (MHADA Chairman to be changed) सोपवलं जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारने ‘म्हाडा’चं अध्यक्षपद गृहनिर्माण मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यास सध्याच्या सरकारमध्ये ती जबाबदारी राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिली जाईल. सध्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असलेले शिवसेना नेते उदय सामंत यांच्याकडे ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदाची धुरा आहे.
महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. तसंच ‘म्हाडा’चा कायदाही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधीमंडळाच्या अधिवेशनात ‘म्हाडा’च्या कायद्यात बदल होण्याची चिन्हं आहेत.
देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्रिपदी असताना निकटवर्तीय अधिकारी संजय उपाध्याय यांची ‘म्हाडा’च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. तसंच त्यांना राज्यमंत्री दर्जा दिला होता. मात्र आता ठाकरे सरकारने त्यांनी नियुक्ती रद्द केली आहे.
म्हाडा म्हणजे काय?
म्हाडा अर्थात ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण’ (Maharashtra Housing and Area Development Authority) ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. सरकार या अंतर्गत वेगवेगळ्या समाज घटकांसाठी घरं बांधते. म्हाडा अंतर्गत आतापर्यंत राज्यात लाखो घरं बांधून झाली आहेत. (MHADA Chairman to be changed)