सुनिल काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन अर्थात एमआयएमचे मुंबईतील आमदार वारिस पठाण यांनी खुलेआम नंगी तलवार नाचवली. भायखळ्यातील जुलूस मिरवणुकीदरम्यान वारिस पठाण यांनी ही नंगी तलवार नाचवली.
ईद ए मिलादच्या निमित्ताने खिलाफत हाऊसच्या जुलूसच्या निमित्ताने मुंबईतील मुस्लिम बहुल भागत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी जुलूस मिरवणूक भायखळ्यात पोहोचली तेव्हा पवार, देवरा यांचं तलवारी देऊन स्वागत करण्यात आलं. त्यावेळी वारिस पठाणदेखील या मिरवणुकीत होते. वारिस पठाण यांनी टेम्पोमधून उतरुननंगी तलवार नाचवली. ते तलवार नाचवत असताना, लोकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं. लोकप्रतिनिधींनी नंग्या तलवारी नाचवणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.
खिलाफत कमिटीच्यावतीने या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ, एमआयएम आमदार वारिस पठाण उपस्थित होते.
प्रेषित मुहम्मदांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मिरवणूक आयोजित करण्यात येते.
त्यापूर्वी शरद पवार यांचं भाषण झालं. “इथे आल्यावर वाटते की देशात भाईचाऱ्याचं वातावरण आहे. खिलाफत चळवळ भारताच्या इतिहासाचा सर्वात ऐतिहासिक भाग आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात त्याचा वापर केला. एकतेसाठी खिलाफत चळवळ महत्त्वाची आहे. पाकिस्तानच्या सामान्य लोकांच्या मनात भारतीयांबद्दल प्रेम आहे. फाळणीनंतर अनेकांची ताटातूट झाली. आजचा हा जलसा एकतेचा संदेश घेऊन पुढे जायला हवा. खिलाफत चळवळीचा इतिहास लक्षात घेऊन एकतेचा नारा पुढे गेला पाहिजे त्याचा देशाला फायदा होईल”, असं पवार म्हणाले.