जळगाव: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या निकाला नंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईबाहेर आज पहिलीच सभा होत आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे यांनी कोकणातील खेड येथून सभा घेत असल्याने शिंदे गट म्हणजेच शिवसेनेकडून आता ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
या सभेआधीच शिवसेनेतील मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सभा घेणे हे उद्धव ठाकरे यांचं काम आहे.
त्यांचं काम ते करतील तर आमचं काम आम्ही करू असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
पक्ष चिन्ह व पक्षाचे नाव गेल्यानंतर उद्धव ठाकरे खेडमध्ये आज प्रथमच सभा घेणार आहेत मात्र सभा घेणे हे उद्धव ठाकरे यांचे कामच असून त्यांचं काम ते करत आहेत.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कोकणाकडे बघितले जाते. त्यामुळे आता खेडमधून ठाकरे गटाची सभा होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार तयार केली जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी आतापासूनच सभेची तयारी करा असं आवाहनही केलं होतं.
तर शनिवारी निष्ठा मातोश्रीशी आणि ईमान भगव्याशी हा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील सभेकडे आता सत्ताधाऱ्यांसह साऱ्या पक्षांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आता शिवेसेनेतील मंत्री गुलाबरावर पाटील यांनी या सभेवरून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह 9 विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राजकारणात केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान पंतप्रधानांकडे तक्रार करणे हे विरोधी पक्षांचे काम असून विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रावर पंतप्रधान निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
केंद्रीय यंत्रणांचा चाललेल्या गैरवापराबद्दलही विरोधकांकडून आता राज्यासह केंद्रातील भाजपवर टीका केली जात आहे. त्याबद्दल गुलाबराव पाटील यांनी बोलताना मात्र याबाबतचा निर्णय पंतप्रधान घेतील असल्याचे त्यांनी सांगितले.