मुंबई : ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे. कारण SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS मधून सहभागी होता येणार आहे. तशी माहिती ऊर्जा विभागानं परिपत्रकाद्वारे 10 फेब्रुवारीला दिली आहे. पण या भरती प्रक्रियेवरुन एका तरुणाने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना थेट कवितेच्या माध्यमातून विनंती केली आहे. महत्वाची बाब म्हणजे मंत्री महोदयांनीही या तरुणाला खास चार ओळीतून उत्तर दिलंय. ही प्रश्नोत्तराची प्रक्रिया पार पडली ती ट्विटरवरुन. संबंधित तरुणाची विनंती आणि मंत्रिमहोदयांनी दिलेला प्रतिसाद आता चांगलाच व्हायरल होत आहे.(Prajakt Tanpure’s special answer to the youth’s question about the recruitment process)
त्याचं झालं असं की, प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका नवरदेवानं घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला. नवरदेवही ऊर्जा खात्यातील कर्मचारी. त्याने आपल्या खात्याशी प्रमाणिक राहत, कामाशी निगडीतच उखाणा घेतला. “आयुष्यभर साथ देतो तोच जोडीदार खरा… आयुष्यभर साथ देतो तोच जोडीदार खरा, संध्याचं नाव घेतो, सगळ्यांनी लाईटचं बिल भरा”. नवरदेवाचा हा उखाणा तनपुरे यांनी ट्विटरवर पोस्ट केला.
याला म्हणतात कर्तव्यदक्ष कर्मचारी !!! pic.twitter.com/tOpTUSeOnj
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) February 24, 2021
तनपुरे यांनी पोस्ट केलेल्या उखाण्याच्या आधार घेत, रोहन ताजने या पेशानं वायरमन असलेल्या तरुणानं मंत्रिमहोदयांकडे खास विनंती केली. “आयुष्यभर साथ देतो तोच कर्मचारी खरा!! प्राजक्त दादाचं नाव घेतो, तनपुरे साहेब आता तरी भरती करा”, अशा शब्दात रोहन ताजने याने मंत्र्यांकडे भरतीची मागणी केली.
तरुणाच्या या विनंतीला तनपुरे यांनीही खास उत्तर दिलं. “भरतीसाठी सदोदित तळमळतो तोच विद्यूत सहाय्यक खरा! तुमच्यासाठी खरच लढतोय जरा धीर धरा!” असं ट्वीट तनपुरे यांनी केलंय.
त्यावर या तरुणानेही छान कोटी केली. “साहेब तुम्ही म्हणतात जरा धीर धरा, पण तुम्ही 100 टक्के प्रयत्न करा”.तरुणाच्या या कोटीवर मंत्रि महोदयांनीही त्याला दाद दिली आणि तू इलेक्ट्रिशियन आहेस की कवी? असा प्रश्न विचारत भरती झाल्यावर तुझा सत्कार करावा लागेल, असं म्हटलं. त्यावर तरुणानेही तनपुरे यांचे आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या :
महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची दिवाळी गोड होणार, ऊर्जामंत्र्यांकडून नियुक्तीचे आदेश
आरोग्य विभागाची भरती पुढे ढकला, विनायक मेटेंची आक्रमक मागणी
(Prajakt Tanpure’s special answer to the youth’s question about the recruitment process