मुंबई: समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात इसमाने आझमी यांच्या पीएला फोन करून आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आझमी यांना शिवीगाळही केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या धमकी प्रकरणी अबू असीम आझमी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
अबू आझमी यांच्या पीएला हा धमकीचा फोन आला होता. आझमी यांनी औरंजेबचं समर्थन करणारं विधान केलं होतं. त्यामुळे आझमी यांना या विधानावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अबू आझमींना फोन दे. तो पुन्हा बोलला तर उडवून टाकणार. कापून टाकणार, असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
हा फोन आल्यानंतर लगेच कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रार मिळाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी भादंवि कलम 506 (2) आणि 504 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
बुधवारी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. आझमी यांच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी अज्ञात इसमाचा शोध घेतला जात असून धमकी कुठून आली? यामागे कोण आहे? याचीही माहिती घेतली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर शासक नसल्याचा दावा केला होता. त्यावरून भाजपने आव्हाड यांना घेरलं होतं. तर आझमी यांनी औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असा दावा केला होता.
अनेक लोकांची नावे औरंगजेब आहेत. खुद्द औरंगाबादेतही अनेकांची नावे औरंगजेब आहेत, असं सांगतानाच औरंगजेबाचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत, असं आझमी म्हणाले होते. लोकांना रोजगार दिला पाहिजे. केवळ जिल्ह्यांची नावे बदलून काही होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील एका डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी काही लोक मुघल शासक औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचताना दिसत होते. या व्हिडीओवरून मोठा गोंधळ उडाला होता. त्याविरोधात संताप व्यक्त करत निदर्शनेही झाली होती. पोलिसांनी डान्स करणाऱ्या 8 जणांविरोधात केस दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळुरपीरमध्ये दादा हयात कलंदर साहब यांच्या संदलचा जुलूस 14 जानेवारी रोजी रात्री काढण्यात आला होता. या संदलमध्ये नाचणाऱ्यांनी गर्दीत मोठमोठे फोटो दाखवले होते. हे फोटो टिपू सुल्तान आणि औरंगजेबाचे होते. हे फोटो हातात घेऊन लोक नाचत होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.