लोकसभा निवडणूक 2024 मधील पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी महायुती आणि महाविकासा आघाडीत जोरदार चुरस दिसून आली. ६ खासदार आणि 36 आमदार असणारं मुंबई देशातलं एकमेव शहर आहे.अखेरच्या टप्प्यात मुंबई, उपनगरं आणि परिसरात जोरदार द्वंद दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या टप्प्यासाठी मुंबईत तळ ठोकवा लागला. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात मोठा गोंधळ उडाला. खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी बोगस मतदानाचा आरोप केला. आता याप्रकरणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे.
मराठी खासदारच निवडून येणार
मुंबईतून मराठी खासदार दिल्या जाणार. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मिहीर कोटेचा यांचा पराभव होणार आहे. किरीट सोमय्या यांनी मराठी माणसावर अन्याय केला, सेना फोडली, गद्दारी करायला लावली याचा देखील राग लोकांच्या मनात होता. संजय पाटील यांच्या विरोधात मोदींना रस्त्यावर रोड शो करायला लागला याचाच अर्थ त्यांच्या उमेदवार हा शंभर टक्के पडणार आहे, असा टोला आमदार सुनील राऊत यांनी लगावला.
तर आमदारांमध्ये अस्वस्थता
लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं. तिथे जाऊन मुख्यमंत्री काय मराठी हिंदीमध्ये बोलणार का? असा सवाल त्यांनी केला. ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी मुख्यमंत्र्यांची गत झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून जर ते लंडनला गेले तरी ते असलेल्या 40 गद्दार आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल आणि फटाफूट होईल, हे त्यांना चांगलेच माहिती आहे. म्हणून ते लंडनला जात नसल्याचा चिमटा राऊतांनी एकनाथ शिंदे यांना काढला.
महाविकास आघाडीच्या राज्यात 37 जागा
सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महाराष्ट्र मध्ये प्रचंड सहानुभूती आहे. त्यामुळे आमच्या 37 जागा महाराष्ट्रामध्ये येथील असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये जिंकेल, असा दावा आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत, महाराष्ट्र ठरवेल की पंतप्रधान कोण होईल, असे ते म्हणाले.
अमोल कीर्तिकर होतील खासदार
कीर्तिकर यांच्यावर कुठलीही कारवाई झाली किंवा नाही झाली तरी देखील गजानन कीर्तिकर यांना काही फरक पडणार नाही. त्यांनी मुलाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे अमोल कीर्तीकर हे खासदार नक्कीच होतील, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला. खासदार गजानन कीर्तिकरांविरोधात एकनाथ शिंदे यांच्या गटात खदखद आहे. उपनेते शिशिर शिंदे यांना त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.