मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी युवासेनाप्रमुख आणि विधानसभा आमदार आदित्य ठाकरे यांच्या टीकेला जसाश तसं उत्तर दिलं आहे. हा संपलेला पक्ष आहे का, गर्दी पाहा आणि जे म्हणाले त्यांची स्थिती काय, असं म्हणत राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. तसेच तुमची स्थिती काय आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे दादरमधील शिवतिर्थावर (शिवाजी पार्क) इथे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.
“बऱ्याच काळानंतर बोलतोय. अनेकांनी मला विचारलं की, एवढे मोठे स्क्रिन कशासाठी लावले आहेत? मी म्हटलं, भाषण संपल्यावर पठाण दाखवणार आहेत. काहीतरी उद्देश असेल म्हणून तर लावले ना? पण आज शिवतीर्थाचा कोपरा न कोपरा भरलेला मला दिसतोय. अनेकांनी सांगितलं होतं की हा संपलेला पक्ष आहे. हा? जे बोलले त्यांची अवस्था काय?”, अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली.
राज्यात एप्रिल 2022 मध्ये मनसेने मशिदीवरील भोंग्यांवरुन रान पेटवलं होतं. तेव्हा हा मुद्दा प्रचंड गाजला होता. तसेच मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी मनेसेने अल्टिमेटम दिला होता. या वेळेत भोंगे काढले नाहीत, तर आम्ही भोंग्यावर हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका मनसेने घेतली होती. यावर मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना मनसेवर टीका केली होती.
“विरोधक आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही काम करतोय ते दिसतंय. संपलेल्या पक्षांवर वक्तव्य करत नाही. ‘रघुकुल रीत सदा चली आये प्राण जाये पर वचन ना जाये’ जनतेला दिलेली वचने आम्ही पूर्ण करत आहोत. मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता.
आदित्य ठाकरे हे लोअर परळ पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पूलाचं कामकाजाची पाहणी करायला आले होते. यावेळेस त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया देत मनसेवर जळजळीत टीका केली होती.
ठाणे शहरातील गडकरी रंगायतन इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मनसेप्रमुखांनी राज्यातील सद्यपरिस्थितीवर गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात भाष्य करणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया देणार असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितंलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांनी चिरफाड केली.
या मेळाव्याच्या आधी प्रसिद्ध एडगुरु भरत दाभोळकर यांनी मनसेत प्रवेश केला. “मला गर्दी पाहून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. त्यांच्या सभेला अशीच गर्दी व्हायची. त्यानंतर अशी गर्दी मी पाहिली नाही”, अशी प्रतिक्रिया दाभोळकर यांनी दिली.
मुख्य मंचाच्या दोन्ही बाजूला एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. या स्क्रीनवर मनसेकडून काय काय दाखवलं जाणार, याबाबत राज्याच्या जनतेला उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान मनसेच्या या मेळाव्यात एकमेव आमदार राजु पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, संदीप दळवी आणि इतर नेते या मेळाव्याला उपस्थित होते.