मुंबई | नवी दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपंटूंचं आंदोलन सुरु आहे. आम्हाला न्याय मिळावा, यासाठी भारताचे हे सुपुत्र आंदोलन करत आहेत. कुस्तीपटंच्या या आंदोलनाने साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. संपूर्ण भारतात हा विषय चर्चिला जात आहे. अशातच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत या प्रकरणात तोडगा काढावा अी विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी पत्र ट्विट करत मोदींना ही विनंती केली आहे.
आमच्यावर भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंकडून करण्यात आला आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर योग्य कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा या मागणीसाठी हे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून आंदोलन करत आहेत.
रविवारी 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्धघाटन करण्यात आलं. यावेळेस हे आंदोलन करणारे कुस्तीपटू शांततेने मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना हटकलं. या दरम्यान झटापट झाली. यानंतर या नॅशनल हिरो असलेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी फरफटत नेलं. पोलिसांनी या कुस्तीपटूंना दिलेली वागणूक पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला.
राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन मोदींना पत्राद्वारे स्वत: लक्ष घालावं असं म्हटलंय. “कुस्तीपटूंची पुन्हा अशी फरफट होऊ नये असं म्हटलंय. तसेच आपण स्वत: या विषयात लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. तसंच या प्रकरणावर तोडगा काढावा”,असं ठाकरे यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांचं मोदी यांना पत्र
सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये.… pic.twitter.com/Qzjivo91xh
— Raj Thackeray (@RajThackeray) May 31, 2023
“सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं” अशी विनंती राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली आहे.
दरम्यान आता विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या पाठीशी अनेक खेळाडू हे पाठीशी उभे राहिले आहेत. अनेकांनी ट्विट करत तसेच विविध माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता या विषयावर केंद्र सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे.