नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य पोलीस महासंचालकांकडे केली. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत जिंकून येण्याआधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला अनेक आश्वासनं दिली होती. ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कलम 420 अंतर्गत देशातील जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालकांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
सत्तेत येण्याआधी नरेंद्र मोदी यांनी देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ (ज्या बेरोजगारीने आज उच्चांक गाठलेला आहे), देशाबाहेर असलेला काळा पैसा भारतात आणू आणि त्यातून देशातील प्रत्येक गोरगरिबाच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रूपये जमा करू, पेट्रोल – डिझेलचे भाव कमी होतील, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू अशी आश्वासनं दिल्याचं गजानन काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. मात्र त्यातील एकही आश्वासन अद्याप पंतप्रधानांनी पूर्ण केलेलं नाही. हीच देशातील जनतेची शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे देशातील जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तत्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्याचं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.