मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी वसई विरार महापालिकेच्या (Vasai Virar Municipal Corporation) साहाय्य उपायुक्तांसोबतच हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आलाय. महापालिकेने पक्षाचे झेंडे काढल्यामुळे अविनाश जाधव आक्रमक आज चांगलेच झाले. मनसेने शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पालिकेच्या खांब्यावर पक्षाचे झेंडे लावले होते. पण हे झेंडे अनधिकृतपणे लावण्यात आल्याचा ठपका ठेवत महापालिकेकडून हे झेंडे काढण्यात आले. महापालिकेकडून सर्व झेंडे कार्यक्रमाच्या आधीच काढण्यात आले. त्यामुळे अविनाश जाधव आक्रमक झाले. त्यांनी महापालिकेचं कार्यालय गाठत उपायुक्तांना थेट जाबच विचारला. अविनाश जाधव यांचा पालिका अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत ते पालिका उपायुक्तांवर चांगलेच भडकलेले बघायला मिळाले.
पक्षाचे झेंडे काढल्यामुळे अविनाश जाधव चांगलेच संतापले. त्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धारेवर धरले. विशेष म्हणजे वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती एचचे सहाय्यक आयुक्त गिल्सन घोणलासविस यांना जाब विचारताना अविनाश जाधव यांनी अश्लील भाषेचाही वापर केला, अशी माहिती समोर आलीय.
मनसेच्या शाखेच्या उद्घाटनासाठी वसई पश्चिम अंबाडी रोडवरील पालिकेच्या खांब्यावर पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. पण हे झेंडे अनधिकृतपणे लावण्यात आल्याचा ठपका ठेवत पालिकेने सर्व झेंडे काढले.
महापालिकेने आज दुपारी ही कारवाई केली होती. पण तोपर्यंत कार्यक्रम झालेला नव्हता. त्यामुळेच अविनाश जाधव जास्त संतापले होते.
कार्यक्रमा अगोदरच झेंडे काढल्याने संतापलेल्या अविनाश जाधव यांनी पालिका अधिकाऱ्याला जाब विचारला. महापालिका शहरातील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करत नाहीत. पण पक्षाचे झेंडे काढते, ही कुठली कारवाई आहे? असा जाब अविनाश जाधव यांनी सहाय्यक आयुक्तांना विचारला.