समाजकंटकांना पोलिस ठोकणार की मी ठोकू? मनसे नेते नितीन नांदगावकरांचा सवाल

| Updated on: Aug 23, 2019 | 3:37 PM

'वर्दीचा मान जे नागरिक ठेवत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तीही भर चौकात, अशी मागणी मनसे नेते नितीन नांदगावकर यांनी फेसबुकवरुन केली आहे.

समाजकंटकांना पोलिस ठोकणार की मी ठोकू? मनसे नेते नितीन नांदगावकरांचा सवाल
Follow us on

मुंबई : समाजकंटकांना पोलिस ठोकणार का मी ठोकू? असा सवाल मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी विचारला आहे. फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून नांदगावकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्याभरात वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नांदगावकरांनी व्हिडीओ शेअर केलेला दिसत आहे.

‘मुंब्रा येथे काही टपोरी मुलांनी ट्राफिक पोलिसांना धक्काबुक्की करुन मारल्याचा जाहीर निषेध, पोलिसांची कॉलर पकडून पोलिसांना मारणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ अशी मागणी नितीन नांदगावकरांनी केली आहे.

‘आपला समाज कुठे चाललाय? कोणीही येतंय आणि पोलिसांना टपली मारतोय. पोलिसांची भीती आहे कुठे. पोलिसांना काही मुले मारत असताना बघे व्हिडीओ काढत आणि तमाशा बघत राहतात, जे पोलिस रात्रंदिवस जनतेची सेवा करतात त्यांच्या मदतीला कोणीच जाऊ नये.’ अशी चिंताही नांदगावकरांनी व्यक्त केली आहे.

‘वर्दीचा मान जे नागरिक ठेवत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तीही भर चौकात. ह्यापुढे पोलिसांवर कोणी हात उचलेल त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावाच लागेल.’ अशी मागणीही त्यांनी केली.

‘पोलीस अशा समाजकंटकांना ठोकू शकत नसेल तर मी त्या सर्वांना रस्त्यावर धिंड काढून ठोकणारच. पोलिसांची भीती असलीच पाहिजे आणि ती नसेल तर येणारा काळ खूप भयानक असेल आणि मी ते होऊ देणार नाही.’ असा इशाराही नितीन नांदगावकरांनी दिला.

कोण आहेत नितीन नांदगावकर?

परप्रांतीय रिक्षाचालकांकडून होणाऱ्या प्रवाशांच्या अडवणुकीविरोधात मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांच्याकडून नेहमी आक्षेप घेतला जायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून नांदगावकर हे पक्षात आहेत.

नांदगावकर हे आपल्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसाठी ओळखले जातात. आपल्या फेसबुक पेजवर ते अनेकदा परप्रांतीयांविरोधातले व्हिडीओ शेअर करत असतात. पोलिसांनी नांदगावकरांना मुंबई, उपनगरं आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली होती.