शर्मिला ठाकरे यांच्याकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 51 हजारांचे बक्षीस जाहीर

| Updated on: Sep 24, 2024 | 12:57 AM

बदलापूर घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडलेली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. पोलीस खात्यावर टीका होत असताना शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना बक्षीस जाहीर केले आहे.

शर्मिला ठाकरे यांच्याकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 51 हजारांचे बक्षीस जाहीर
SharmilaThackeray Akshay Shinde
Follow us on

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. बंदूक घेत तीन राऊंड फायर केले, याला प्रत्युत्तर देताना आत्मरक्षणासाठी त्याचा एन्काऊंटर केल्याचं पोलिसांनी सांगितलं. विरोधक या एन्काऊंटरवरून सरकारवर टीका करत आहेत, मात्र मनसेने पोलिसांनी योग्य केल्याचं म्हणत घटनेचे समर्थ केले आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन्ही पोलिसांना प्रत्येकी 51 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी माहिती दिली.

जे झालं ते योग्य झालं, ज्या पद्धतीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. झालेल्या घटनेचे आम्ही समर्थन करतो. शर्मिला ठाकरे यांनी दोन्ही पोलिसांनी 51 हजार रूपये बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत तर त्यांच्या जीवावर बेतलं गेलं असतं, याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

बाळासोबत ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी विरोधक कुठे होते? झालेली घटना योग्य असून ज्यांच्या घरात तीन ते चार वर्षांची मुलगी आहे ते सगळेत आनंदात असतील. बदलापूरमध्ये या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनावेळी ज्यांनी पोलिसांचा मार खाल्ला, अंगावर गुन्हे घेतले त्या सर्वांनाच आज आनंद झाला असेल. पोलीस खात्यातील कोणाचा जीव गेला असता तर काय केलं असतं. आमचा पोलीसवाला जाण्यापेक्षा हा गेला ते उत्तम. राज ठाकरे स्वत: दोन्ही पोलिसांसोबत बोलणार आहेत. पण आता उपचार सुरू असतील तर त्यांना त्रास देऊ नका, असं त्यांचं मत आहे. जेव्हा त्यांना बरे वाटेल तेव्हा राज ठाकरे त्यांची नक्की विचारपूस करतील, असंही अविनाश जाधव यांनी सांगितलं.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला?

ठाणे क्राईम ब्राँच युनिट 1 मध्ये अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल होता. त्याचा तपास करण्यासाठी ठाणे क्राईम ब्राँच तळोजा जेलमध्ये गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. यामधील एक गोळी API निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले. त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस अधिकाऱ्याने त्याला गोळ्या घातल्या. यामध्ये अक्षय शिंदे आणि जखमी पोलीस अधिकारी यांना कळवा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याला उपचारासाठी नेत असताना अक्षय याचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

दरम्यान, बदलापूरमधील आरोपींच्या एन्काउंटरनंतर मालाडमध्ये बँड वाजवून आणि फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. मालाड पूर्वेतील कुरार भागात बदलापूर येथील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर लोक बँड वाजवून आणि फटाके फोडून आनंद साजरा करताना दिसले.