संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला कसा झाला?, मास्क लावून आले, हल्ला पूर्वनियोजित; मनसेचा आरोप

| Updated on: Mar 03, 2023 | 8:35 AM

शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांच्या सांगण्यानुसार चार ते पाच जण शिवाजी पार्कात तोंडाला मास्क लावून बसले होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना एकटं पाहिलं. आणि त्यांच्यावर अचानक जोरदार हल्ला चढवला.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला कसा झाला?, मास्क लावून आले, हल्ला पूर्वनियोजित; मनसेचा आरोप
Sandeep Deshpande
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आनंद पांडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज पहाटे जीवघेणी हल्ला झाला आहे. तोंडाला मास्क लावून आलेल्या चार ते पाच जणांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. स्टम्प आणि लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांना एकटं गाठून हा हल्ला करण्यात आला आहे. हा पूर्वनियोजित हल्ला आहे, असा दावा करतानाच हल्लेखोर कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही. पण हा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आम्ही शोधून काढूच, असा इशारा मनसेचे नेते संतोष धुरी यांनी दिला आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कात हल्ला झाल्यानंतर माजी नगरसेवक आणि मनसेचे नेते संतोष धुरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला कुणी केला? का केला? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आम्ही त्याचा शोध लावूच. आम्हाला हल्ला कोणी केला हे कळेलच. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही हल्लेखोरांचा शोध घेऊच. कशाकरीता झाला? कोणत्या कारणामुळे झाला? आणि कोणी केला ? ते माहीत नाही. हा भ्याड हल्ला होता. हातात स्टम्प होते. एकटा माणूस बघून हल्ला करण्यात आला, असं संतोष धुरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

फिल्डिंग लावून हल्ला केला

शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांच्या सांगण्यानुसार चार ते पाच जण शिवाजी पार्कात तोंडाला मास्क लावून बसले होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना एकटं पाहिलं. आणि त्यांच्यावर अचानक जोरदार हल्ला चढवला. संदीप देशपांडे कधीच एकटे मॉर्निंग वॉकला जात नाही. आम्ही चार पाच लोक त्यांच्यासोबत नेहमी असतो. पण आज ते एकटेच मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यांना एकटं पाहूनच हा हल्ला करण्यात आला. कदाचित पाळत ठेवून हा हल्ला केला असावा. फिल्डिंग लावून झालेला हा हल्ला आहे. हा पूर्वनियोजित हल्ला होता हेच यातून स्पष्ट होतंय, असंही त्यांनी सांगितलं.

एकटं गाठून हल्ला

देशपांडे आजच एकटे फिरत होते. त्याचा फायदा घेतला आणि हल्ला केला. संदीप देशपांडे यांनी हल्ला झाल्यावर प्रतिकार केला. फक्त पायाला स्टम्प लागला. असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प होते. तोंडाला मास्क होता, असं संदीप देशपांडे यांनी मला सांगितलं. हा भ्याड हल्ला होता. मास्क लावून आले होते. चेहरा दाखवून हल्ला करण्याची त्यांची हिंमत नव्हती, असं धुरी म्हणाले.