तुम्ही वीज कनेक्शन तोडा, आम्ही तुम्हाला तोडू, मनसेची वरळीत बॅनरबाजी

| Updated on: Nov 27, 2020 | 1:03 PM

वीज तोडणीसाठी आल्यास संपर्क साधण्यासाठी मनसे पदाधिकारी संतोष धुरी यांनी वरळीत बॅनर लावले आहेत

तुम्ही वीज कनेक्शन तोडा, आम्ही तुम्हाला तोडू, मनसेची वरळीत बॅनरबाजी
Follow us on

मुंबई : तुम्ही वीज कनेक्शन तोडा, आम्ही तुम्हाला तोडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारला दिला आहे. वाढीव वीज बिलाविरोधात राज्यव्यापी आंदोलन केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांनी वरळीत बॅनरबाजी केली आहे. (MNS Leader Santosh Dhuri appeals not pay electricity Bill warns Thackeray Government)

वीज तोडणीसाठी आल्यास संपर्क साधण्यासाठी मनसेने वरळीत लावले आहेत. आम्ही सर्व उपाय करुन बघितले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले. त्यात संघर्षाचा उल्लेख आहेच, मात्र यापुढे गाठ महाराष्ट्र सैनिकांशी आहे, असा इशारा संतोष धुरी यांनी दिला.

भरमसाठ वीज बिल प्रकरणी मनसेने काल (27 नोव्हेंबर) राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मात्र अनेक ठिकाणी शासनाने मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांची पोलिसांशी धुमश्चक्री उडाली.

आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि रवी मोरेंसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर मनसे त्यांच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला होता.

सरकारला वाढीव वीज बिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील. आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, मात्र वीजबिल भरू नका. काय होतं ते पाहू पुढे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

राज्यभरात मनसेचा आंदोलनाचा ‘झटका’; मुंबईत विराट मोर्चा, तर ठाण्यात पोलीस-मनसे कार्यकर्त्यांत बाचाबाची

ठाकरे सरकार मनसेला घाबरते; भाजपच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही? : अविनाश जाधव

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा ‘झटका मोर्चा’, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

(MNS Leader Santosh Dhuri appeals not pay electricity Bill warns Thackeray Government)