मुंबई: नाणार प्रकल्पाला विरोध करुनही राजकीय फायदा न मिळाल्यामुळे आता ‘इतर फायदे’ पदरात पाडून घेण्यासाठी मनसेने (MNS) आपली भूमिका बदलल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेने (Nanar refinery) केला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार अविनाश सौंदळकर यांना 2014 पेक्षा कमी मते पडली,पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त 14 गावातून तीन आकडीही मते मिळाली नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तर मनसे नावालाही नव्हती. त्यामुळे आता नाणार परिसरातील राजकारणाला तिलांजली देऊन समर्थनाची भूमिका घेऊन अन्य काही फायदे होत असतील तर घ्यावेत, अशी मनसेच्या स्थानिक नेत्यांची भूमिका असल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र भडेकर यांनी केला. (Nanar refinery Project opponents take a dig at MNS)
या संघटनेकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कृष्णकुंजवर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेले लोक नाणारचे ग्रामस्थ नसल्याचा दावा करण्यात आला आहे. नाणार प्रकल्पाचे समर्थक आणि RRPCL कंपनीचे अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून राज ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला मनसेचे नेते अनिल शिदोरे हे RRPCL कंपनीचे सीईओ बालासुब्रमण्यम अशोक व अनिल नागवेकर यांनी भेटले होते.
या भेटीनंतर मनसेच्या थिंक टँकच्या बैठकीत रोजगार, सीएसआर फंडातून विकास कामे, देवळे- घरे विस्थापनातून वगळणे, फसवणूक झालेल्या जमीनधारकाना स्पेशल पॅकेज या चतुसूत्री या मागण्यांच्या मोबदल्यात समर्थन देण्याविषयी विचारविनिमय झाला. तसेच स्थानिक पातळीवर पक्षाच्या पिछेहाटीचा मुद्दा चर्चिला गेला. या सगळ्यानंतर मनसेच्या भूमिकेत बदल होऊन राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याचा आरोप रामचंद्र भडेकर यांनी केला आहे.
नाणार प्रकल्पाचे समर्थक राज ठाकरे यांना 28 फेब्रुवारीलाच भेटणार होते. पण मुख्यमंत्र्यांना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला व ही भेट एक आठवडा लांबणीवर पडली. समर्थनाच्या बदल्यात या सगळ्यांना कंपनी नक्की काय देणार हे लवकरच कळेल.
स्थानिकांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता केवळ कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नादाला लागूनच अचानक दोन वर्षानंतर समर्थनाची डायरेक्ट भूमिका मांडणे हे सरळ सरळ विश्वासघातकी कृत्य आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच दुःखावलो गेलो आहोत. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असून कुणी कितीही प्रयत्न केला तरी रिफायनरी नाणार परिसरात येऊ देणार नाही, याची सर्वांनी खात्री बाळगावी, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊन देऊ नका, असे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांना पाठवले होते. हे पत्र वाचल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना ही माहिती दिली. मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा खुलासाही राज यांनी केल्याचे समजते.
संबंधित बातम्या:
नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत
हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी; शिवसेनेचं आव्हान
(Nanar refinery Project opponents take a dig at MNS)