मुंबई : मुंबईतील ज्या फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनं केली, मोर्चे काढले, आता त्याच फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यालयाबाहेर बसवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला (Hawker Seating Outside MNS Office) आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात आज (13 फेब्रुवारी) मनसेकडून पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डवर मोर्चा काढला जाणार आहे. मनसेने पालिकेच्या या निर्णयाचा विरोध केला असून रहिवासी परिसरात फेरीवाले बसू देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईत सध्या मनसे विरुद्ध पालिका असं चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी करत विराट मोर्चा काढणार्या मनसेच्या ‘राजगड’च्या खालीच आता महापालिकेने फेरीवाले बसवण्याचा निर्णय घेतला. राजगड असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्क्वेअर फुटपाथवर तब्बल 100 फेरीवाले बसवले जाणार असल्याचा निर्णय पालिकेने घेतला. पालिकेच्या याच निर्णयाविरोधात मनसे मोर्चा काढणार आहे.
मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून न्यायालयाच्या आदेशानुसार पावले उचलली आहेत. त्यानुसार, प्रथम केलेल्या फेरीवाला क्षेत्राला लोकांच्या झालेल्या विरोधानंतर सुधारीत यादी तयार करण्यात आली. या सुधारित यादीनुसार महापालिकेने विविध विभागातील फेरीवाला क्षेत्रातील पदपथावर एक बाय एकच्या आकाराच्या जागा रंगवण्यास सुरुवात केली आहे. यात दादर, माहिम आणि जी/उत्तर विभागामध्ये 14 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या 14 रस्त्यांवर 1 हजार 485 फेरीवाल्यांना बसण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे.
या ठिकाणी बसणार फेरीवाले
धारावी 60 फूट रोड : 80 फेरीवाले
माहिम एम.एम.सी रोड : 50 फेरीवाले
भागोजी किर रोड : 50 फेरीवाले
माहीम सुनावाला अग्यारी रोड : 100 फेरीवाले
शितलादेवी रोड: 150 फेरीवाले
पद्माबाई ठक्कर रोड : 100 फेरीवाले
एन.सी.केळकर रोड : 100 फेरीवाले
एल.जे.रोड : 300 फेरीवाले
सेनापती बापट मार्ग : 200 फेरीवाले
व्ही.एस.मटकर मार्ग : 30 फेरीवाले
बाबुराव परुळेकर मार्ग : 50 फेरीवाले
भवानी शंकर रोड : 75 फेरीवाले
गोखले रोड : 100 फेरीवाले
पंडित सातवडेकर मार्ग : 100 फेरीवाले