अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ला मनसेचा विरोध, पुरस्कार रद्द करण्याची मागणी

| Updated on: Jan 25, 2020 | 11:31 PM

केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे (MNS oppose Padma shri to Adnan Sami).

अदनान सामीच्या पद्मश्रीला मनसेचा विरोध, पुरस्कार रद्द करण्याची मागणी
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे (MNS oppose Padma shri to Adnan Sami). अदनान सामी मूळ भारतीय नागरिक नसल्याचं कारण सांगत मनसेने अदनान सामीचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली आहे. मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत मनसेची भूमिका जाहीर केली.

अमेय खोपकर म्हणाले, “मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, असं मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मनसेची मागणी आहे.”


मोदींकडून अदनान सामीला एवढं लिफ्ट करण्याचं काय कारण? : मनसे

सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं. अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच 4 वर्षांमध्ये त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असाही सवाल खोपकर यांनी उपस्थित केला.


दरम्यान, अदनान सामीने पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करत आभार मानले आहेत. अदनान सामी म्हणाला, “आपल्या सरकारकडून कौतुक होणं आणि मान्यता मिळणं हा कोणत्याही कलाकारासाठी सर्वात मोठा क्षण असतो. भारत सरकारने दिलेल्या पद्मश्री पुरस्काराने मी अगदी भारावून गेलो आहे.”