‘ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था उद्ध्वस्त केली पाहिजे’; राज ठाकरे कडाडले, सत्ताधाऱ्यांचे कान टोचले

| Updated on: Aug 26, 2024 | 11:36 PM

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभरातून शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. अवघ्या आठ महिन्यातच पुतळा कोसळल्याने विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक पोस्ट करत सत्ताधाऱ्यांचे कान टोचलेत.

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था उद्ध्वस्त केली पाहिजे; राज ठाकरे कडाडले, सत्ताधाऱ्यांचे कान टोचले
Follow us on

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे फक्त आठ महिन्यातच महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर यावरून जोरदार निशाणा साधला आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. त्यासोबतच राज ठाकरे यांनी कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविताही पोस्ट केली आहे.

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले 
ज्योतिबा म्हणाले , शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ्यांटचा
आंबेडकर म्हणाले ,मी फक्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

 

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो, अशा परखड शब्दात राज ठाकरे यांनी आपली भूमिक मांडली आहे.