मुंबई: चालत्या लोकलमध्ये अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.परवेज फकरुद्दीन सिद्दीकी असं या आरोपीचं नाव आहे. दोन बहिणी त्यांचा भाऊ आणि एक मैत्रीण असे चौघेजण बोरिवली नॅशनल पार्क इथे फिरायला गेले होते. तिकडून परत आल्यानंतर त्यांनी दादर रेल्वे स्थानकातून लोकल रेल्वेचा सेकंड क्लास डब्बा पकडून, रात्री 11 वाजताच्या दरम्यान ठाण्याकडे निघाले होते.
या वेळी लोकलमध्ये गर्दी होती. याचा फायदा घेत आरोपी परवेजने यातील 23 वर्षीय तरुणीशी लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली. ती तरुणी त्वरित त्याच्यापासून दूर झाली.परंतु या आरोपीने पुन्हा 17 वर्षीय तिच्या बहिणीशी अश्लील चाळे आणि अश्लील संभाषण करण्यास सुरुवात केली.
या वेळी या मुलीने आरडाओरडा करत तिच्या भावाला याची माहिती दिली. कुर्ला रेल्वे स्थानकात परवेजला इतर प्रवासी आणि तिचा भावाने उतरविले आणि त्याला कुर्ला लोहमार्ग पोलिसांचा ताब्यात दिले. पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेत मुली-महिलांशी लगट करणाऱ्यांची संख्या खूप आहे. अशा नराधमांना वेळीच रोखण्याची गरज आहे.