मुंबई : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरूच आहे. या पावसामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जूनपासून ते आतापर्यंत पावासामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 97 वर पोहोचला आहे. गुरुवारी नागपुरात (Nagpur) पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरमधील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर (Palghar), ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आपत्ती निवारण अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यातील काही भागांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पाऊस सुरूच असल्यामुळे जिल्ह्यातील नद्या धोक्याक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, ज्या गावात पूर परस्थितीमुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशा गावातील नागरिकांचे सुरक्षीतस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या मुंबई- वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काम करणारे कामगार बुधवारी रात्री वैतरणा तलावाची पाणीपातळी अचानक वाढल्याने पाण्यात अडकले होते. सकाळी त्यांची बोटीच्या मदतीने सुटका करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मराठवाडा कायमच दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा वरूनराजा मराठवाड्यावर देखील धो-धो बरसत आहे. आतापर्यंत पावसामुळे मराठवाड्यात 34 जणांचा बळी गेला आहे. धक्कादायक म्हणजे यातील 24 जण विजेच्या धक्क्याने दगावले आहेत. पाऊस सुरूच असून, राज्यातील मोठ्या धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. धरणाची पाणीपातळी वाढली असल्याने एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.