मुंबई : बळीराजाला सुखवणाऱ्या पावसाने यावर्षी मात्र अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. गेल्या काही महिन्यात पाच ते सहा वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीनंतर सरकारकडून काही पंचनामे झाले असले तरी, काही शेतकऱ्यांना अजूनही त्यांची भरपाई मिळाली नाही. त्यामुळे यंदा मान्सून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणार की नुकसानीचा यावेळीही सामना करावा लागणार असे प्रश्न पडलेले असतानाच हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी मात्र यंदाचा मान्सून राज्यात वेळेवर हजर होणार असून त्याला कोणतीही अडचण नसणार असंही रामचंद्र साबळे यांनी सांगितले.
यंदाचा मान्सून राज्यात वेळेवर हजर होणार असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. काही वेळा राज्यात हवामानामुळे मान्सून उशिराने दाखल होतो.
त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. त्यामुळे यंदा हवामान तज्ज्ञांनी मान्सूनविषयी आशादायी चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व भागात मान्सून वेळेवर हजर होणार असल्याने यंदाचा मान्सूनचा काळ हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मान्सूनविषयीचा अंदाज सांगताना सांगितले की, 20 ते 22 मे किंवा त्या आधी मान्सून अंदमान निकोबारात दाखल होणार आहे.
त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून येण्याचा रस्ता मोकळा असल्याने मान्सून राज्यात वेळेत दाखल होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात येणार असल्याने आतापासूनच शेतकऱ्यांनी शेतीची जय्यत तयारी सुरु केली आहे. यावेळी त्यांनी राज्यात मान्सून वेळेवर येण्यास कोणतीही अडचण येणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.