मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : दिल्लीतील प्रदुषणाने नागरिकांचा श्वास कोंडला असताना आता मुंबई देखील त्याच वाटेवर चालली आहे. मुंबईने देखील प्रदुषणाच्या बाबतीत रेकॉर्ड तोडला आहे. मुंबईत बुधवारी सकाळी दाट धुके दाटले होते. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ( AQI ) 113 इतका होता. तर दिल्लीचा AQI 88 इतका होता. दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरापैकी एक मानले जाते. सर्वसामान्यपणे नोव्हेंबरनंतर दरवर्षी शहरातील प्रदुषणातच्या पातळीत वाढ होत असते.
गेले दोन दिवस हवेच वेग कमी झाला आहे आणि आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महानगरातील अनेक भागात धुक्याची चादर पसरली आहे. अशा कोंदट वातावरणामुळे लोकांना श्वसनास त्रास होऊ शकतो. सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता AQI 115 होती. प्रदुषण विभागाने दिलेल्या माहितीनूसार मुंबईतील अंधेरी परिसरात प्रदुषणाची पातळी सर्वात जास्त होती. येथील हवेची गुणवत्ता पातळीचा दर AQI 346 वर पोहचला होता. तर माझगाव येथे 317 आणि नवी मुंबईत AQI 317 इतका होता. त्याशिवाय मुंबईतील चेंबूर आणि मालाड येथे हवेची प्रदुषणाची पातळी खालावलेली होती.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की दिल्लीत मंगळवारी कमाल तापमान 26.2 डिग्री सेल्सिअस होते. जे सामान्यापेक्षा सात डीग्री कमी आहे. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. दिल्लीत रात्रभर झालेल्या पावसाने किमान तापमानात घट झाली आहे. सकाळी सामान्यापेक्षा दोन डिग्री कमी 17.2 डीग्री तापमान नोंदले गेले आहे.
दाट धुक्यामुळे बुधवारी मध्य रेल्वेच्या लोकल 15 मिनिटे उशीराने धावत होत्या. कल्याणच्या पुढे धुक्याने दृश्यमानता कमी झाल्याने लोकलसेवेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत होते. वासिंद आणि टिटवाळा दरम्यान सकाळी 6.30 ते नऊ वाजेपर्यंत तर कर्जत आणि बदलापूर दरम्यान स.5.30 पासून नऊ वाजेपर्यंत दाट धुक्याचा सामना मोटरमनना करावा लागला. धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल 15 मिनिटे उशीराने धावत होत्या.