सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 ला शिवरायांच्या या स्मारकाचं अनावरण झालं. मात्र उद्धाटनानंतर केवळ आठच महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यावरून राजकारण तापलं आहे. शिवरायांच्या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याने पुतळा कोसळल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत शिवारायांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे “शक्तीस्थळ” असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे, असं अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांच्या कामगिरीसोबत डोळ्यासमोर उभे राहतात ते अभेद्य गडकिल्ले…. ज्या शिवरायांनी अभेद्य किल्ले बांधले. सर्वांचे आदर्श असलेल्या महाराजांचा पुतळा मात्र उद्घाटनानंतर आठ महिन्यातच कोसळला आहे. त्यावरून विरोधक, इतिहास अभ्यासक तसंच शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. भ्रष्ट कारभारामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. वैभव नाईक यांनी मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जात तोडफोड केली.