मुंबई : राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईतील मराठा आंदोलक तरुणांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत लवकरच मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार आहोत. मात्र मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा संभाजीराजेंनी यावेळी दिला. (Sambhajiraje meets Maratha Protesters) काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपसमितीच्या अध्यक्षपदावर नको, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली.
छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांची दुपारी भेट घेतली. सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला आहे. मराठा तरुणांच्या आंदोलनाचा आज (सोमवार 2 मार्च) 36 वा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग केल्यानंतर दोन तरुणांची प्रकृती बिघडली आहे.
‘मराठा तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांचं काही बरंवाईट झाल्यास सरकार जबाबदार असेल’ असं संभाजीराजेंनी ठणकावून सांगितलं. आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी दिला. तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलक तरुणांना आश्वस्त केलं.
हेही वाचा : मराठा तरुणांचं 27 दिवसांपासून आंदोलन, अद्यापही नियुक्त्या न होणं हे दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
राजकीय उद्देशाने नाही, तर छत्रपतींचा वंशज म्हणून मी आलो आहे. आरक्षण जाहीर केल्यावर 16 टक्के आरक्षणामधून ज्या 3 हजार 500 तरुणांना नोकरीसाठी कॉल आला, त्यांना काम मिळालं नाही. मला कोणत्याही सरकारला दोष द्यायचा नाही. पण आता या तरुणांना न्याय कुणी द्यायचा? हे सरकार कोण चालवतं, मुख्यमंत्री की अधिकारी? असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार आहे. मराठा तरुणांनी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानंतर राजकीय पक्षांनी यात उडी घेतली आहे. ‘तुमची भूमिका स्पष्ट करा, अशी माझी मागणी आहे. मराठा समाज शांतिप्रिय आहे, मात्र नोकरी दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु’ असा इशारा संभाजीराजेंनी दिला. (Sambhajiraje meets Maratha Protesters)