मुंबई: रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. दम असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी कोणत्याही जिल्ह्यातून माझ्याविरोधात लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. तसेच मुंबई महापालिकेत (bmc) शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी मी प्रचारासाठी उतरणार आहे. शिवसेनेला जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तिथे मी जाणार आहे, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं. तसेच संजय राऊत यांनी मला खड्ड्यात टाकण्याचं विधान केलं होतं. त्याविरोधात थेट पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नवनीत राणा यांना आज चार दिवसानंतर लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी काही महिलांनी त्यांचं औक्षण करत त्यांची ओवळणी केली. त्यानंतर त्यांना हनुमान चालिसाचं पुस्तक, शंख आणि हनुमानाची मूर्ती दिली. त्यानंतर या ठिकाणी शंखनाद करण्यात आला. यावेळी नवनीत राणा भावूक झाल्या होत्या. नवनीत राणा मीडियाशी संवाद साधत असताना त्यांना गहिवरून आलं होतं. त्यांचे डोळे पाणावले होते.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने माझ्यावर अत्याचार केला आहे. तुम्ही सत्तेचा दुरुपयोग केला. तुम्हाला आव्हान देते लोकांमध्ये येऊन निवडणूक लढून निवडून दाखवाच. महाराष्ट्रात कोणताही जिल्हा निवडा. तुमच्या विरोधात मी उभी राहते. तुमच्यात दम असेल तर निवडून दाखवा. पूर्वजांच्या पुण्याईने तुम्ही निवडून आला आहात. आता महिला ताकद काय असते हे दाखवून देईल. दोन पिढ्यांपासून तुमच्याकडे मुंबई महाालिका आहे. तुमची ही भ्रष्टाचाराची लंका नष्ट करणार. मुंबई महापालिका निवडणुकीत तुमच्याविरोधात प्रचारासाठी मुंबईत येणार. मुंबईला न्याय देण्यासाठी येणार. भ्रष्टाचारी लंकेला पराभूत करण्यासाठी माझी जिथे जिथे गरज पडेल तिथे मी जाऊन प्रचार करेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राम आणि हनुमानाच्या नावाने तुम्ही जो अन्याय केला. त्याला जनता उत्तर देईल. मुंबई महापालिकेत मी पूर्ण ताकदीने मी बाहेर पडेल. लोक तुम्हाला जागा दाखवतील उत्तर देतील, असंही ते म्हणाले. जे लोकं श्रीरामाला मानणारे आहेत. आणि जिथे जिथे माझी गरज आहे. तिथे तिथे मी रामभक्तांचा मी प्रचार करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मला तुरुंगात चटई दिली नाही. उभं राहावं लागलं. मी डॉक्टरांना लिहून दिलं, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. पोपटाने सांगितलं वीस फूट खड्ड्यात गाडू. पण त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. दिल्लीत जाऊन मी तक्रार करणार आहे. पंतप्रधानांकडेही तक्रार करणार आहे, असंही त्या म्हणाल्या.