मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामाही मागण्यात आला. त्यानंतर भाजपसह शिंदे गटानेही रस्त्यावर उतरुन अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ निघालेल्या मोर्चावर माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना सवाल उपस्थित करण्यात आले.
त्यानंतर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते.
त्यावेळी हे सन्मानार्थ मोर्चे काढणारे कुठे होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जे आज रस्त्यावर उतरलेले आहेत.
त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल रस्त्यावर उतरावं नंतर त्यांनी सवाल उपस्थित करावे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांनी सांगितले की, ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्ही भूमिका मांडत आहोत.
मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्यासाठी नेमलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून परत पाठवा अशीही मागणी आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अपमानजनक वक्तव्य करूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा साधा निषेधही नोंदविला नाही.
आणि त्यांचीच लोकं आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी त्यानंतर पुढचं बघू असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.