मुंबई | 14 जानेवारी 2024 : कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचे कारण स्पष्ट करताना कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मिलिंद देवरा हे आगामी लोकसभा निवडणूक मुंबई दक्षिण मतदार संघातून लढविणार अशी चर्चा आहे. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद देवरा हे राज्यसभेवर जाणार की लोकसभा लढवणार याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे.
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करताना मी कॉंग्रेस सोडेन असे कधीच वाटले नव्हते असे म्हटले. पण, पक्ष सोडण्याचे कारण म्हणजे पक्षाने मेरीट आणि योग्यता यांना कधीच महत्व दिले नाही. उद्धव ठाकरे यांनीही तीच चूक केली. त्यांच्याकडून ती चूक झाली नसती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते, अशी टीका केली.
मिलिंद देवरा यांच्या या टीकेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही ठाकरे गटाला चांगलाच टोला लगावला आहे. मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये आल्यानंतर शिवसेनेची ताकद वाढणारच आहे. खऱ्या अर्थाने जो काही अन्याय त्यांच्यावर काँग्रेसमध्ये होत होता त्याला आता वाचा फुटलेली आहे असे ते म्हणाले.
आम्ही ज्या पद्धतीने विकासाची कामे करत आहोत. त्या विकासाला भाळून मिलिंद देवरा आमच्या पक्षामध्ये येत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यावर काय आप बीती झाली ते पुढे सांगतील. या निमित्ताने मला फक्त एवढं सांगायचं आहे की काही झालं तरी देखील शिवसेनेचा आता अंत जवळ आलेला आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी काजी जण माझ्या मतदारसंघांमध्ये आले. त्यांनी सभा घेण्याचा प्रयत्न केला. रोड शो केला. पण, 300 कार्यकर्तेही उद्धव ठाकरे जमवू शकले नाही. यातच त्यांचे अपयश समोर येत आहेत. ते फ्रस्ट्रेट झाले आहेत. त्यामुळे माझ्या प्रेस्क्रीप्शनचा देखील त्यांच्यावर कुठलाही प्रभाव पडणार नाही. संजय राऊत हे देखील माझ्या प्रेस्क्रीप्शनच्या बाहेरचे रुग्ण आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.