आज कोणतीही कारवाई होणार नाही, आता घरी जा, धारावीतील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु

| Updated on: Sep 21, 2024 | 1:11 PM

यानंतर धारावी तणावाची स्थिती पाहायला मिळाली. आता अखेर या आंदोलनावर तोडगा निघाला आहे.

आज कोणतीही कारवाई होणार नाही, आता घरी जा, धारावीतील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु
Follow us on

Dharavi Dispute Request Protestors to stop : मुंबईतील धारावी परिसरात गेल्या दोन तासांपासून तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. धारावी परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक सकाळी पोहोचले. यानंतर काही लोकांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोडही केली. यानंतर धारावी तणावाची स्थिती पाहायला मिळाली. आता अखेर या आंदोलनावर तात्पुरता तोडगा निघाला आहे. या धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी आलेली पालिकेची तोडक कारवाई आज थांबवण्यात आली आहे, अशी माहिती एका आंदोलनकर्त्याने दिली.

नेमकं काय घडलं?

धारावी परिसरात आज सकाळी एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक पोहोचले. हे पथक दाखल होताच धारावीतील स्थानिक लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर काहींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोडही केली. यानंतर काही मिनिटातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी सुरुवातीला काही लोक रस्त्यावर बसून आंदोलन करत होते. पण त्यानंतर काहींनी आजूबाजूला असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली.

तर काही आंदोलकांकडून धारावीतून जाणारे रस्तेही रोखण्यात आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस बंदोबस्तात वाढ केली. यानंतर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे काही पदाधिकारी धारावीत दाखल झाले. यावेळी पोलिसांनी धारावी आंदोलनकर्त्यांमधील काही आंदोलकांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान या आंदोलनावर तोडगा निघाला.

“आज कोणतीही कारवाई होणार नाही”

यानंतर एका आंदोलनकर्त्याने पोलीस स्टेशनबाहेर येत सर्व आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आज कोणतीही कारवाई होणार नाही. आम्हाला ६ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत आम्ही कोर्टात जाऊ आणि तिथे न्याय मागू”, असे त्या आंदोलनकर्त्याने म्हटले.

यानंतर त्या आंदोलनकर्त्याने सर्व आंदोलन करणाऱ्या धारावीतील नागरिकांना शांत व्हा, आपपल्या घरी जा, असे आवाहन केले. यानंतरही परिसरात मोठा तणाव पाहायला मिळाला. “मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, ही कारवाई थांबवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांना वातावरण शांत करुन आपपल्या घरी जा. कोणतीही कारवाई होणार नाही. तुम्ही सर्वजण घरी जा. आता सर्वांनी घरी जा. या ठिकाणी हिंदू-मुस्लीम समाज एकत्र राहतो. त्यामुळे उगाचच द्वेष पसरवण्याचे काम कोणीही करु नये. शांतता राखावी. लोकांच्या भावनांशी खेळू नका. देवाच्या नावावर उगाचच लोकांना विभक्त करु नका”, असेही आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले.

मात्र यानंतरही धारावीत आंदोलनकर्त्यांचा गोंधळ सुरु होता. अनेक धारावीकर हे आम्हाला ही कारवाई मान्य नाही, असे सांगत होते. ही कारवाई रद्द करावी, अशीही मागणी सातत्याने केली जात होती. यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. मी इथे आहे, पोलीस इथे आहेत. त्यामुळे इतका विश्वास ठेवा आणि घरी जा. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुमची मदत होणं गरजेचे आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.