मुंबई/ नंदकिशोर गावडे : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या टीमकडून बोगस बियाणे विकणाऱ्या व्यावसायिकांवर धाड टाकून कारवाई करण्यात आली होती. मात्र ही धाड टाकल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. सामना वृत्तापत्रातून या कारवाईविरोधात टीका करण्यात आल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट सामना आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला होता. त्यांच्या त्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना खासदार विनायक राऊत यांनीही त्यांना थेट आव्हान दिले आहे.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर दावा ठोकून दाखवा असं आव्हान देत, ही धाड नव्हती तर ती खंडणी गोळा करण्यातील प्रकार होता असा आरोपही विनायक राऊत यांनी त्यांच्यावर केला आहे.
विनायक राऊत यांनी आरोप करताना म्हटले आहे, सत्तार यांचे पीए आणि सेक्रेटरींकडून खंडणी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यात हिम्मत असेल तर दावा ठोकावा असा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणीही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. अयोध्या पोळ यांच्यावर हल्ला करणारे हे गुंड हे शिंदे-फडणवीस पुरस्कृत होते असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. या प्रकरणात अयोध्या पोळ यांनी पोलीस तक्रार देण्यास गेल्यानंतरही त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदे पुरस्कृत गुंडाकडून हा हल्ला करण्यात आला असला त्या घाबरल्या नसून शासनकर्त्या गुंडाकडून हा हल्ला करण्यात आल्याने त्यांच्यावर कारवाई करा ही अपेक्षाही फोल ठरणारी आहे असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.