मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षेला आता सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पेपर फुटीची प्रकरणे लक्षात घेता आयोगाने हा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षेवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान तसेच परीक्षेनंतरच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर तसेच त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यात उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाईही (Criminal action) केली जाणार असल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. परीक्षेकरिता नियुक्त कर्मचारी आणि आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे, असे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे. एमपीएससी परीक्षेत आतापर्यंत झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयोगातर्फे ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. आयोगाने म्हटले आहे, की पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021मध्ये उमेदवारांकडून होऊ शकणारे संभाव्य गैरप्रकार विचारात घेऊन आयोगाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल.(2/2)
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 29, 2022
यावर्षीच्या सुरुवातीला एमपीएससी पूर्वपरीक्षेचा पेपर फुटला होता. नागपुरात हा प्रकार उघड झाला होता. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका सेंटरवर फोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रश्नी काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलनही केले होते. परीक्षा केंद्रप्रमुख आणि एका लिपिकाने आपल्यासमोर प्रश्न संचाच्या तीन सीलपैकी एक सील आधीच फोडण्यात आल्याचे एका विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्तीने म्हटले होते. यासर्व पार्श्वभूमीवर हे सीसीटीव्ही आता गैरप्रकारांवर नजर ठेवणार आहेत.