चार महिन्यातला पाऊस दोन महिन्यातच; मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?

| Updated on: Jul 31, 2024 | 8:16 AM

यंदा मुंबईत मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही.

चार महिन्यातला पाऊस दोन महिन्यातच; मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?
मुंबईतील पावसाचे फोटो
Follow us on

Mumbai Rainfall Record : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत सुरुवातीला रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर पकडला. काही आठवड्यांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. विशेष बाब म्हणजे मुंबईत पावसाच्या चार महिन्यात होणारा पाऊस यंदा दोन महिन्यातच झाला आहे. मुंबईच्या हवामान विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे.

मुंबईत जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे अनेक धरण आणि तलाव क्षेत्रातील पाणीसाठ्यातही वाढ झाली. आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत हंगामातील 86 टक्के पाऊस हा दोन महिन्यात झाला आहे. मुंबईत पावसाळ्याच्या चार महिन्यांत म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत मिळून होणाऱ्या पावसापैकी जवळपास 86 टक्के पाऊस दोन महिन्यातच झाला आहे.

चार महिन्यात कोसळणारा पाऊस दोन महिन्यातच

मुंबईत जून ते सप्टेंबर असे चार महिने पाऊस कोसळतो. यातील काही महिन्यात अगदीच कमी पाऊस पडतो. तर काही महिन्यात खूपच मुसळधार पाऊस कोसळतो. यंदा जून आणि जुलै या दोन महिन्यात 86 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यात म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत कोसळणारा पाऊस दोन महिन्यातच झालेला पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. आता पुढील तीन चार दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळी हंगाम हा 1 जून ते 30 सप्टेंबर असा ग्राह्य धरण्यात येतो. या कालावधीत मुंबईत कुलाबा केंद्रात सरासरी 2213.4 मिमी पावसाची नोंद होते. तर सांताक्रुझ केंद्रात सरासरी 2502.3 मिमी पावसाची नोंद होते. यंदा मात्र कुलाबा केंद्रात एकूण सरासरीच्या 86 टक्के तर सांताक्रुझ केंद्रात सरासरीच्या 81 टक्के पावसाची नोंद अवघ्या दोन महिन्यांत झाली आहे.

जुलैमध्ये भरुन काढली जूनची तूट

यंदा मुंबईत मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यानंतर जुलैमध्ये मात्र एक-दोन दिवस विश्रांती घेत मुंबई शहर आणि उपनगरांत सतत मुसळधार पाऊस कोसळत होता. जुलैमध्ये पावसाने जूनची तूट भरुन काढली. त्याबरोबर जून-जुलैमध्ये होणाऱ्या एकूण पावसापेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद केली.

मुंबईत 1 जून ते 30 जुलैपर्यंत कुलाबा येथे 1893.7 मिमी तर सांताक्रूझ येथे 2037.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये कुलाबा केंद्रात 648.7 मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात 673.5 मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान आता पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.