लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी… निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. एका बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. सपाचे नेते अबु आझमी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. अबू आझमी लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अबु आझमी यांच्या पाठीशी मुस्लिम मतदार जास्त आहे. विशेषत: मुंबईतील मुस्लिम समाजाचा अबु आझमी यांना पाठिंबा आहे. अशातच जर अबू आझमी राष्ट्रवादीत गेले तर अजित पवार यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
अबू आझमी लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी अबू आझमी यांची पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मुंबईत आणि विशेषत: ईशान्य मुंबईच्या जागेवर राष्ट्रवादी आणि पर्यायाने महायुतीला अबु आझमी यांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे अबु आझमी आता अजित पवार गटात कधी प्रवेश करणार हे पाहणं महत्वाचं असेल.
अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. शिवाय मानखुर्द शिवाजीनगर या मुंबईतील मतदारसंघाचे ते आमदार आहेत. सलग तीनवेळा ते या मतदारसंघातून निवडून आलेत. तसंच राज्यसभेचे ते खासदार देखील राहिलेले आहेत. समाजवादी पक्ष मगाराष्ट्रात वाढवण्यात अन् पसरवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. मुस्लीम समाज मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी आहेत.
अबू आझमी हे जनाधार असणारे नेते आहेत. मानखुर्द भागातील लोकांच्या मनात त्यांची प्रतिमा चांगली आहे. स्थानिकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे जर अबू आझमी राष्ट्रवादीत गेले तर अजित पवार यांची मुंबईच्या मानखुर्द भागातील ताकद वाढू शकते. येत्या काळात अबू आझमी लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अबू आझमी एकटेच राष्ट्रवादीत जातात की सपाचे इतर नेतेही राष्ट्रवादीत प्रवेश करतात हे पाहणं महत्वाचं असेल.