मुंबई : मुंबईत एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे (AC local Doors) जर स्टेशनवर उघडलेच नाहीत, तर काय करायचं? असा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागला आहे. कारण गेल्या 15 दिवसात सलग दुसऱ्यांदा स्टेशनवर (Railway Station in Mumbai) दरवाजेच न उघडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. मंगळवारी प्रवासी कल्याणहून एसी लोकलने निघाले. दादरला (Dadar railway Station) नेहमीप्रमाणे उतरायचं म्हणून प्रवासा सज्ज होते. पण एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत. दरवाजे उघडण्यात अडचण झाली की चालक दरवाजे उघडायला विसरला, या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत लोकल दादर स्थानकातून निघालेली होती. त्यामुळे प्रवासी हतबल झाले. आधीच उशीर झालेल्या प्रवाशांना आणखी उशीर झाला. कल्याण-सीएमसएमटी 6.32 ची लोकल दादर स्थानकात आल्यानंतर तिचे दरवाजे उघडले न गेल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला. महत्त्वाचं म्हणजे हे असं पहिल्यांदा घडतंय, अशातलाही भाग नाही. याआधीही अशीच घटना घडलेली आहे.
तारीख 27 जून! सकाळी 9.03 मिनिटांची ठाणे सीएएमसटी एसी लोकल निघाली होती. तिकिटात सूट मिळाल्यानं प्रवाशांचीही पसंती एसी लोकलला जास्त असल्याचं दिसून आलं. लोकलला अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी पाहायला मिळाले. गारेगार प्रवास सुरु झाला. ठाणे ते मशिद बंदरपर्यंत सगळा प्रवास अगदी सुरळीत झाला. आता सीएसएमटी येणार म्हणून प्रवाशीही दरवाजापाशी येऊन उतरण्यास सज्ज झाले.
आणि दादरला एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत! #MumbaiAcLocal #ACLocal #Mumbai pic.twitter.com/4iZe073xzd
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 12, 2022
गाडी सीएसएमटी स्थानकात पोहोचली. थांबली. पण लोकलचे दरवाजे काही उघडलेच नाहीत. आता दरवाजे का बरं उघडत नाहीत? हे कळायला काही मार्ग नव्हता. लोकल स्थानकात आल्यानंतर मोटरमन खाली उतरला आणि चालू लागले. पण थोड्याच वेळात त्याला घडलेला प्रकार लक्षात आला आणि पुन्हा येऊन त्यानं अखेर लोकलचे दरवाजे उघडले.
हा किस्सा सध्या मुंबईच्या लोकलमध्ये हमखास ऐकायला मिळतोय. दरम्यान, असं काही झालं असण्याचं वृत्त रेल्वेनं फेटाळलंय. पण मुंबई लोकलने आणि त्यातही एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र लोकलचे दरवाजे न उघडण्याचा प्रकार दुसऱ्यांदा अनुभवायला मिळालाय. त्यामुळे आता लोकलचे दरवाजे उघडायला मोटरमन विसरला की काय? अशी शंका घेतली जातेय. विशेष म्हणजे याबाबतचा व्हिडीओही समोर आला आहे.