‘तो’ करार अखेर रद्द; आदित्य ठाकरे म्हणाले, यातून सिद्ध झालं, मुंबई महापालिका आयुक्त समझोता करू इच्छित नाहीत!

| Updated on: Nov 09, 2023 | 3:45 PM

Aditya Thackeray on Mumbai Municipal Contract Cancel : माजी पर्यावरण मंत्री, ठाकरे गटाचे नेते, आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महापालिका आयुक्त हे समझोता करू इच्छित नाहीत!, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. वाचा काय म्हणाले आदित्य ठाकरे...

तो करार अखेर रद्द; आदित्य ठाकरे म्हणाले, यातून सिद्ध झालं, मुंबई महापालिका आयुक्त समझोता करू इच्छित नाहीत!
Follow us on

मुंबई | 09 नोव्हेंबर 2023 : मुंबई शहर रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा कंत्राटदारांसोबतचा करार अखेर रद्द झाला आहे. काम सुरु करण्याच्या सूचना दिल्यानंतरही 10 महिने उलटून गेल्यावरही काम सुरु न केल्याने दक्षिण मुंबईतील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. काल या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने काल (बुधवार) मंजुरी दिली. यावर माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रासोबत महापालिका आयुक्त हे समझोता करू इच्छित नाहीत. हे यातून स्पष्ट होतंय, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

बीएमसीच्या रस्ते विभागाने रस्त्यांचं कॉंक्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलं आहे. रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीसोबत यासाठी करार झाला होता. तो करार रद्द करण्याची शिफारस मुंबई महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला अखेर मंजुरी देऊन हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 हजार 687 कोटी रुपयांचं हे कंत्राट देण्यात आलं होतं. काम सुरू करण्यास उशीर झाल्याने करार रद्द झाला. शिवाय RSIIL ला 52 कोटी रुपयांचा दंडही द्यावा लागला आहे. आदित्य ठाकरे यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.

आदित्य ठाकरे यांचं ट्विट जसंच्या तसं

मेगा रोड घोटाळ्यातील एका कंत्राटदाराला अखेर नारळ!

जानेवारी 2023 पासून, मी दर महिन्याला, मुंबई महापालिका प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईवर थेट नियंत्रण मिळवलेल्या ‘मिंधे-भाजप’ राजवटीत मुंबईला सर्व बाजूंनी लुटण्याची कशी योजना आखली गेली आहे ह्याबद्दल सातत्याने आवाज उठवत आहे.

रस्ता घोटाळा 6 हजार 80 कोटींचा आहे, ज्यातून हा निधी त्यांच्याच कंत्राटदार मित्रांच्या झोळीत टाकण्याचा कट सुरु होता.

शेवटी, काल माझ्या ट्विटनंतर, आयुक्तांनी दक्षिण मुंबई रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराचा करार संपुष्टात आणण्यासाठी फाइलवर स्वाक्षरी केली आहे… ज्याच्याकडे 1687 कोटींची कामे होती, पण काम मात्र सुरूच झाले नव्हते.

फाईल आयुक्तांच्या डेस्कवर पडून होती आणि त्यावर स्वाक्षरी न करण्याचा जबरदस्त दबाव वरुन असावा हे स्पष्ट दिसत होतं.

गेल्या 11 महिन्यात, दर महिन्याला सातत्याने मुंबईकरांची लूट करणार्‍या ह्या मेगा रोड घोटाळ्यातील BMC आणि खोके सरकारचा आम्ही पर्दाफाश करत आलो.

आणि आज शेवटी हे सिद्ध झालंच!

आमच्या ट्विट आणि पूर्वीच्या पत्रकार परिषदांनी हे सुनिश्चित केलं, की मुंबई आयुक्त बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रासोबत समझोता करण्यात काहीही मदत करू शकणार नाहीत.

आणि आता जेव्हा आमचा हा मुद्दा रास्त ठरला आहे, तेव्हा बाकीच्या कामांबद्दलही आम्हाला आणखी बरेच प्रश्न आहेत… ज्याची उत्तरं आम्ही मिळवणारच!