मुंबई: जगभरात वायू प्रदूषणाने पाय पसरले आहेत. वायू प्रदूषणाने राजधानी दिल्लीत तर टोक गाठलं आहे. तोंडाला मास्क लावून बाहेर पडण्याची वेळ दिल्लीकरांवर आली आहे.
एकीकडे हवा प्रदूषण वाढत असताना, त्यावरील हटके उपाययही निघत आहेत. पाण्याला पर्याय म्हणून बाटलीबंद पाणी बाजारात आलं, त्याप्रमाणेच आता बाटलीबंद हवाही बाजारात आली आहे. चीनमध्ये अशा बाटलीबंद शुद्ध हवेची विक्री सुरु झाली आहे.
जगभरात शुद्ध हवेचा हा प्रश्न जटील होत असताना, इकडे मुंबईकरांवरही बाटलीबंद हवा घेण्याची वेळ लवकरच येऊ शकते. मुंबईतही वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मे 2018 मधील अहवालानुसार, वायू प्रदूषणात मेगासिटी मुंबई ही जगात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यातच आता दिवाळीनंतर हे प्रदूषण वाढणार यात शंका नाही. गेल्या वर्षी दिवाळीच्या पाच दिवसात मुंबईच्या वायूप्रदूषणात दुपटीने वाढ झाली होती. त्यामुळे यामध्ये यंदाही वाढ होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यातच मेट्रो कारशेडसाठी असंख्य झाडं तोडून, शुद्ध हवेचा खजिनाच लुटला जाणार आहे.
बाटलीबंद हवा
बाटलीतून शुद्ध हवा विकणाऱ्या व्हायटॅलिटी एअर या कंपनीचं मूळ आहे कॅनडातील अल्बर्टा प्रांतात. इथे पहिल्यांदा दीड लाख लीटर हवा बाटलीबंद करण्यात आली. तीही केवळ 40 तासात. ही किमया साधणारा अवलिया आहे मोझेस लॅम.
अल्बर्टा विद्यापीठातून कॉमर्स ग्रॅज्युएट असलेले मोझेस लॅम हे आता 32 वर्षांचे आहेत. जगातल्या प्रत्येक माणसाला शुद्ध हवा मिळावी, असा ध्यास घेतलेल्या मोझेस यांनी 2015 च्या मार्च महिन्यात व्हायटॅलिटी एअर कंपनीची सुरुवात केली.
सुरुवातीला ही बाटलीबंद करण्यात आलेली शुद्ध हवा चीनमध्ये विकण्यात आली. शांघाय, बीजिंगनंतर व्हायटॅलिटी एअर कंपनीने आपला मोर्चा आता भारताकडे वळवलाय.
व्हायटॅलिटी एअरचं भारतातील कामकाजही भारतीय वंशाच्या व्यक्तीकडेच सोपवण्यात आलंय. मूळचे भारतीय आणि सध्या कॅनडाचे रहिवाशी असलेले जस्टीन धालीवाल हे भारतात बाटलीबंद हवा विकणार आहेत.