गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 02 मार्च 2024 : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. राज्यातील मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. मनोज जरांगे यांचे मित्र अजय बारस्कर महाराज हे देखील मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आरोप करत आहेत. आज माध्यमांशी बोलताना अजय बारस्कर महाराज यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षण मिळावं यासंदर्भात आमची भूमिका आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षण मिळालं. मात्र, त्यांच्या अंतर्गत दुर्गुणामुळे मराठा आरक्षणाला तडा गेला आहे, असं अजय बारस्कर महाराज म्हणाले.
मी मराठा आरक्षणासाठी लढतो. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात देखील आम्ही लढलो आहे. त्याचं म्हणणं आहे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो मात्र त्यांना कोणी वकीलपत्र दिलं आहे. एकदा गुणरत्न सदावर्ते आणि दुसरीकडे कोटी मराठे आहेत. त्यामुळे माझी मागणी आहे, आपलं राज्य कायद्यावर चालतं. एका माणसाला संविधानाने किती ताकद दिली आहे हे दिसतं. मात्र, जितके खर्च आम्ही कायदेतज्ञांवर खर्च केलं नाही तितके खर्च फुलांवर जेसीबीवर झाला. गुणरत्न सदावर्तेंविरेधातली लढाई आम्ही सुरु ठेवणार आहे, असं अजय बारस्कर महाराज म्हणाले.
आमची हयात फडणवीस यांच्याविरोधात गेली मग आम्ही सरकारचा माणूस कसा? मी मराठा समाजाचा माणूस आहे. अशात मला जीवेमारण्याची धमकी दिली तरी जनजागृती मी करणार आहे. सगेसोयरेचा ड्राफ्ट करताना मी तिथे होतो. सगेसोयरेचं श्रेय हे मनोज जरांगे यांचे आहे. त्यांनीच सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला आहे. कायदेशीर प्रक्रिया समजावून त्यांनी सगेसोयरेचा ड्राफ्ट स्विकारला. तिकडे सरकारनं देखील वेगाने काम करावं, काम संथ गतीनं सुरुय असा माझा आरोप आहे, असा आरोप बारस्कर यांनी केला आहे.
सगेसोयरेचा ड्राफ्ट स्वीकारल्यानंतर तो लागू करावा आणि त्यासंदर्भात कोणी आवाहन दिलं तर त्याची जबाबदारी जरांगे यांच्या अभ्यासकांची आणि जरांगे यांची आहे. सरकारनं सरकारचं काम केलं आहे. आता जरांगेंची जबाबदारी आहे ते टिकले पाहिजे. छत्रपतींच्या समोर सरकारनं शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांनी देखील तो ड्राफ्ट अंमलात आणावा. आमच्या हातात काय आलं? हा देखील प्रश्न आहे. मनोज जरांगेंकजून दावा केला जातो दीड कोटी जणांना आरक्षण मिळालं. मात्र ४०-४५ हजार लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत, असंही ते म्हणाले.