गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 02 मार्च 2024 : जातीजातीत विद्वेष तयार झाला. ओबीसी-मराठा वाद सुरु झाला. लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं असं जरांगे बोलले, ते कसं पुसणार? धनगर आणि आदिवासी यांना आरक्षण मिळवून देतो, असं सांगितलं. अरे पण आपल्यालाच मिळालं नव्हतं अशात त्यांना कसं मिळवून देणार? फडणवीस आणि त्यांच्या जातीनं नाव घेतलं. राजकीय वक्तव्य तुम्ही करायला लागलात. व्यक्तीविरोधात आम्ही संघर्ष केला नाही. तुकोबारायांचं नाव घेता आणि दुसऱ्याच्या आईंना शिव्या देता… आईचा अपमान झाला तरी तुम्ही माफी मागितली नाही, असं म्हणत अजय बारस्कर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केला आहे.
तुम्ही धमक्या देतांना मराठ्यांना का समोर करता? नेतृत्वाची दिशाच नाही आहे. प्राधान्यक्रम शिका. शरद पवार यांचं नाव घेता, त्यांच्याकडून तुम्ही शिका… नवीन गुन्हे आता दाखल झालेले आहेत. या सगळ्यात मराठा तरुणांना भोगावे लागलं. रागात आणि नाराजीत सत्य कळत नाही. माझी कळकळीची विनंती मराठा समाजाला कळेल, असं मत अजय बारस्कर महाराज यांनी व्यक्त केलं.
सरकारला कायद्याने राज्य चालवावं लागतं. अशात यांनी जे शब्द सांगितले ते शब्द सरकारनं ड्राफ्टमध्ये टाकले होते. सरकार मराठा समाजासमोर झुकलं होतं जरांगेंसमोर झुकलं नव्हतं. सरकारनं शीघ्रगतीनं काम करावं आणि सगेसोयरे संदर्भातला प्रश्न संपवला पाहिजे. जरांगेंचा दावा आहे की, दीड कोटी जणांना आरक्षण मिळालं. मात्र 40 ते 45 हजार लोकांच्याच नोंदी सापडल्या आहेत. यातील काही जणांनी आधीच लाभ घेतलेला आहे. 24 डिसेंबरपासून किती जणांनी दाखले घेतले हे सरकारनं जाहीर करावं. जेवढं मिळायला पाहिजे होतं त्यापेक्षा जास्त आमचं नुकसान झालं, असं अजय महाराज बारस्कर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल तोडून दोनदा यांचं उपोषण सोडवलं. फोटो व्हायरल झालेत. त्यात तिसरं उपोषण कोणाच्या हातून सोडवलेत. आपण वेडेवाकडे बोललेत तर प्रतिक्रिया तशीच येते. बाकी मला आत शिरायचे नाही. मात्र ते ट्रोल होताना दिसत आहेत, असं म्हणत बारस्कर यांनी जरांगेंच्या उपोषणावर भाष्य केलं.