मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) सध्या रुग्णालयात आहेत. तर त्यांचे पुत्र अमित ठाकरे पक्षाच्या पुनर्बांधणी कार्यक्रमात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातले महाविकास आघाडी सरकारही धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. थोडक्यात काय, तर राज्यातली राजकीय स्थिती ही अस्थिर आहे. या सर्व घडामोडीत आपला पक्ष कसा मजबूत होईल, याकडे लक्ष देऊन आहेत, ते अमित राज ठाकरे (Amit Thackeray)… शस्त्रक्रिया झाल्यामुळे राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. वडिलांच्या या अनुपस्थितीत आणि वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत अमित ठाकरे यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मनविसेची ही जबाबदारी असून पुनर्बांधणी संपर्क अभियान त्यांच्या माध्यमातून राबविले जात आहे.
मनविसेच्या संपर्क अभियानाच्या माध्यमातून अमित ठाकरे मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील दोन आठवड्यांत अमित ठाकरे यांनी जवळपास 35 विधानसभा मतदारसंघात या संपर्क अभियानाच्या माध्यमातून 7 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच त्यांना मनविसेची कशी साथ लाभणार याविषयी अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. दररोज किमान किमान दोन विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्षाच्या कार्यालयात मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाच्या अंतर्गत ते महाविद्यालयातील तरुण आणि तरुणींना भेटत आहेत.
साधारणपणे 9 जूनपासून या अभियानास सुरुवात झाली. या अभियानांतर्गत 23 जूनपर्यंत अमित ठाकरे यांनी 35 विधानसभा मतदारसंघात बैठक घेतली. एकूण सात हजार आणि त्याहूनही अधिक विद्यार्थी आणि गटांशी त्यांनी संवाद साधला आहे. मुंबईतील महाविद्यालयातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसे युनिट स्थापन करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तर या अभियानात काम करण्याची इच्छाही अनेकांनी व्यक्त केली.
राज ठाकरे सध्या रुग्णालयात असून असून त्यांची काळजीदेखील घेण्याचे काम अमित ठाकरेंकडून होत आहे. दिवसा अभियानात व्यस्त तर सर्व काम आटोपल्यानंतर वडिल राज ठाकरेंची काळजी घेण्याचे काम सध्या त्यांच्याकडून होत आहे. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनविसेच्या या संपर्क अभियानाचा पक्षाला फायदा होणारे असल्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.