गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये करताच अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन सुरुवात करत आहे. भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे. मी काही मागणी केली नाही. मला जे काही सांगितलं जाईल ते करेल. मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी आलो. मी आज जास्त बोलणार नाही. मी पक्षात नवीन आहे. योग्यवेळी योग्य गोष्टी बोलणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा , फडणवीस, बावनकुळे, शेलार यांचे आभार मानतो. आम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलिकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. आयुष्याची खरी सुरुवात करत आहे. ३० वर्षाच्या राजकीय प्रवासाचा बदल करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे. वाटचाल करणार आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
देशाच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे यासाठी मी आलो आहे. मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना विकासाचा दृष्टीकोण ठेवून मी काम करत राहिलो आहे. विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेल. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मोदींनी सबका साथ सबका विकास हे ब्रीद ठेवून अनेक कामे केली. आम्ही मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहे. आम्ही विरोधात असतानाही आम्ही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही चांगल्या कामाचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्याही कामाचं कौतुक केलं आहे. आजपासून पुढे आता आम्ही एकत्र काम करू, असं अशोक चव्हाण म्हणाले.