मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता. सगळा मनमानी कारभार सुरू होता, असं अशोक चव्हाण म्हणाले. निवडणुकांच्या अनुषंगानेही अशोक चव्हाण यांनी महत्वाचं विधान केलं आहे. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये तयारी नव्हती. काँग्रेसमध्ये कोणतेही बदल दिसत नव्हते. कितीकाळ स्वत:ची कोंडी होऊ द्यायची, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशाच ही आगामी लोकसभा निवडणूक कशी जिंकायची याची तयारी नव्हती. त्यामुळे ही निवडणूक कशी जिंकायची याची माझ्यासोबतच अनेकांना प्रश्न होता. सध्याची देशातील परिस्थिती पाहता आंदोलन करण्याची ही वेळ होती. असं असताना काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू होतं. या सर्व कार्यपद्धतीबाबत मी सूचना केल्या. पण त्याची दखल घेतली जात नव्हती. पक्षात टीमवर्क कुठेही दिसत नव्हतं. शेवटी किती वाट पाहायची? काँग्रेस पक्षात चांगले बदल दिसत नव्हते. स्वत:ची किती कोंडी होऊ द्यायची?, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 12 फेब्रुवारीपासून आपण काँग्रेसचं सदस्यत्व सोडत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसला रामराम केल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर भाजपची पत्रकार परिषद होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यसमिती सदस्य पद (Member of Congress Working Committee), महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे सदस्यत्व आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी आज राजीनामा दिला आहे.
Today I have resigned from the post of Member of…
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 12, 2024