मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट

| Updated on: Sep 21, 2024 | 9:08 AM

तो मुंबईतील गोवंडी परिसरात नातेवाईकांसोबत राहत होता. सध्या पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट
Follow us on

Mumbai Bandra Worli Sea Link Suicide : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच आता मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्ताफ मोहम्मद हुसेन असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो मुंबईतील गोवंडी परिसरात नातेवाईकांसोबत राहत होता. सध्या पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १९ सप्टेंबरला मध्यरात्री १ च्या सुमारास वांद्रे वरळी सी लिंकवरुन एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही वांद्रे-वरळी सी लिंकच्या 83 आणि 84 या पोल जवळ पोहोचलो. त्यावेळी तिथे एक गाडी उभी होती. एमएच 43 बीएक्स 7670 असा त्या गाडीचा नंबर होता. ही कार एका बाजूला उभी करुन त्यातील एका व्यक्तीने सी-लिंकवरुन थेट समुद्रात उडी मारली.

रात्री मृतदेह शोधण्यात अडथळा

यानंतर वरळी पोलिसांनी लगेचच वरळी आणि वांद्रे अग्निशमन दलाला याबद्दलची माहिती दिली. त्यांनी बॅटरीच्या सहाय्याने समुद्रात उडी घेतलेल्या सदर व्यक्तीचा शोध घेतला. पण रात्रीची वेळ आणि समुद्रात भरती तसेच उंच लाटा असल्याने त्याचा शोध लागला नाही. यानंतर सकाळी दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला.

घटनेचा अधिक तपास सुरु

या घटनेनंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यानंतर पोलिसांनी तपास केला असता अल्ताफ मोहम्मद हुसेन असे या उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मुंबईतील गोवंडी येथे आपल्या नातेवाईकांसोबत राहतो. ऑनलाईन गेमिंगच्या नादातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी हुसेनचा मोबाईल फोन व कॅबची कागदपत्रे जमा केली आहे. त्याचा फोन लॉक नसल्याने पोलिसांना त्याचा भावाचा नंबर मिळाला आणि त्याची ओळख पटली. मात्र सध्या या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले? यामागचे कारण काय? याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.