उद्यापासून बेस्टच्या पास दरात वाढ, पाहा नेमकी किती दरवाढ

| Updated on: Feb 29, 2024 | 2:11 PM

मुंबईची सेंकड लाईफ लाईन म्हटली जाणाऱ्या बेस्टच्या मासिक आणि दैनंदिन पास दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ उद्या 1 मार्च पासून लागू केली जाणार आहे. तोट्यात असलेल्या बेस्ट परिवहन उपक्रमाला संजिवनी देण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. बेस्टचे तिकीटदर मात्र कायम आहेत. बेस्टचे विनावाताकुलीत किमान तिकीट पूर्वीप्रमाणेच पाच रुपये आहे.

उद्यापासून बेस्टच्या पास दरात वाढ, पाहा नेमकी किती दरवाढ
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : मुंबईची दुसरी लाईफ लाईन समजली जाणाऱ्या बेस्टच्या पासदरात वाढ करण्यात आली आहे. उद्या 1 मार्च पासून ही दरवाढ लागू झाली आहे. बेस्ट प्रशासनाचा परिवहन उपक्रम तोट्यात आहे. पालिकेच्या अर्थसहाय्यावर बेस्टचा गाडा कसातरी सुरु आहे. यामुळे बेस्टने आपले दैनंदिन आणि पासदरात बदल केले आहेत. बेस्टचा दैनंदिन पास ( दैनिक तिकीट ) देखील वाढल्याने बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याची झळ बसणार आहे. तसेच मासिक पासमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

बेस्टचा परिवहन उपक्रम प्रचंड तोट्यात आहे. बेस्टला पालिकेच्या मदतीवर आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा लागत आहे. बेस्टने किमान तिकीट दर पाच रुपये केल्यानंतर प्रवासी वाढतील अशी बेस्टची अपेक्षा होती. परंतू बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 25 लाखाच्या आसपासच राहीली आहे. एकेकाळी बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 35 लाखांच्या आसापास होती. कोरोनाकाळात बेस्टला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. कोरोनाकाळात लोकल सेवा आणि इतर सेवा बंद असताना मुंबईत बेस्टच्या वाहनांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरु ठेवून मुंबईला अक्षरश: जगविण्याचे काम बेस्टने केले होते.

अशी आहे दरवाढ

बेस्टने आता दैनिक पासदरात ( अमर्यादित प्रवास ) 50 रुपयांवरुन 60 रुपये अशी वाढ केली आहे. तर अमर्यादित मासिक पास आता 750 रुपयांवरुन 900 रुपये झाला आहे. गणवेशधारी विद्यार्थ्यांकरीता पूर्वी प्रमाणे मोफत पास असणार आहे. सुधारित बसपास योजनेत एकूण 42 ऐवजी आता 18 प्रकारचे सवलतीचे बसपास असतील. या बसपासमध्ये 6 रु., 13 रु., 19 रु., तसेच 25 रु. पर्यंतच्या विद्यमान वातानुकूलित आणि विनावातानुकुलित प्रवासभाड्याच्या साप्ताहिक आणि मासिक पास उपलब्ध केले आहेत. अमयार्दित बसप्रवासासाठी दैनंदिन 60 रु. आणि 900 रु. मुल्यवर्गात बसपास उपलब्ध केले आहेत.

पालिका विद्यार्थ्यांना मोफत पास कायम

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये मुल्याचा मासिक पास उपलब्ध असून यात अमर्यादीत बस फेऱ्यांची सुविधा देण्यात आली आहे. या बसपासमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ज्येष्ठ नागरिकांना मासिक पास योजनेत 50 रुपये सवलत कायम ठेवली आहे.साप्ताहिक पासात ज्येष्ठांना कोणतीही सवलत नाही. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशात असताना मोफत पास सुविधेत बदल झालेला नाही. तसेच 40 टक्क्यांहून अधिक अपंगांना देखील मोफत पास योजनेत कोणताही बदल केलेला नाही.

पासचे सुधारित दर –