मुंबई बोट अपघातप्रकरणी मोठी अपडेट, नेव्हीच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल

| Updated on: Dec 19, 2024 | 8:29 AM

नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई बोट अपघातप्रकरणी मोठी अपडेट, नेव्हीच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल
Follow us on

Mumbai Boat Accident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ काल संध्याकाळी मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या बोट 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. मात्र, समुद्रात गेल्यानंतर या बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटने धडक दिली आणि ही बोट बुडाली. या दुर्घटनेत नौदलाच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदल (Indian Navy) च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. ही धडक इतर जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातावेळी बोटीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कलम १०६(१), १२५(अ)(ब), २८२, ३२४(३)(५) अन्वये तपास सुरू केला आहे.

स्पीडबोट चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर नेव्हीच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या व्यक्तीने बोट धडकल्याचा तो व्हिडीओ काढला, त्याच व्यक्तीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नाथाराम चौधरी असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी स्पीड बोट वरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून बोटीचा तपास सुरु

तसेच या दुर्घटनेनंतर नेव्हीची ती स्पीड बोट नेव्हीने टो करुन नेली आहे. पोलिसांकडून त्या बोटीची पाहणी केली जात आहे. या तपासात काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेव्हीच्या स्पीड बोटवरील तीन जणांचा यात मृत्यू झाला असून 1 जण गंभीर आहे. मात्र या चौघांपैकी स्पीड बोट नेमकी कोण चालवत होतं, याबद्दल नेव्हीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच ही स्पीड बोट चालवणारे टेस्टिंग करणारे होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.