Mumbai Boat Accident : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया जवळून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेतील मृतांचा संख्या आता १३ वर पोहोचली आहे. यात तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेत 101 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अद्याप काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता गेट वे ऑफ इंडियाजवळ पोलिसांकडून पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे गेट वे ऑफ इंडियाजवळ सध्याची परिस्थिती काय याचीही माहिती समोर आली आहे.
मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदल (Indian Navy) च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. ही धडक इतर जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातावेळी बोटीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.
आता सध्या गेट वे ऑफ इंडियाजवळ पोलिसांकडून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. काल रात्री अंधार असल्याने काही वेळ शोध मोहीम थांबवण्यात आली होती. आता आज पहाटेपासून पुन्हा पोलिसांनी रेस्क्यू मोहीम सुरु केली आहे. सध्या पोलिसांची रेस्क्यू टीम समुद्रात बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे. अनेक पोलीस स्पीड बोट घेऊन तैनात झाले आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी गेट ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरून ही स्पीड बोट घेऊन समुद्रात शोध मोहीमेसाठी जात आहे.
नीलकमल बोट दुर्घटनेतील दोन प्रवाशी अद्यापही बेपत्ता आहेत. यात ७ वर्षीय जोहान निस्सार पठाण आणि ४३ वर्षीय हंसराज भाटी हे दोघे बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समुद्रात मदत आणि बचावकार्य अद्यापही सुरू आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी दोघं अत्यवस्थ आहेत. या अपघातात नेव्हीच्या अधिकाऱ्यांसह एकूण तीन कर्मचारी देखील दगावले.
या बोट दुर्घटनेनंतर गेटवे ऑफ इंडिया वर लाईफ जॅकेटचा खच वाढला आहे. दुर्घटनेनंतर सुरक्षेसाठी राखीव ठेवलेल्या लाईफ जॅकेट्स पुन्हा बाहेर काढत प्रवाशांना लाईफ जॅकेटची सक्ती केली जात आहे. बोट चालकांनी आज काळजी घेणारी जी पद्धत सुरू केली आहे, ती यापुढे देखील कायम ठेवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तर काही प्रवासी फोटो काढण्यासाठी लाईफ जॅकेट घालत नसल्याचे बोटवरील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र लाईफ जॅकेटच्या वापरावर यापुढे अधिक नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया सध्या व्यक्त केली जात आहे.